प्रथम पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायत माळेगावला पुरस्कार वितरण करताना पालकमंत्री गिरीश महाजन. समवेत पदाधिकारी.
स्वच्छता अभियान लोेकचळवळ व्हावी : महाजन
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जलयुक्त अभियान ही लोकचळवळ झाल्याने हे अभियान यशस्वी झाले. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत अभियान ही लोकचळवळ झाल्यास हे अभियान यशस्वी होईल. त्यासाठी सर्वांनी स्वत:पासून स्वच्छतेची सुरुवात करावी, असे आवाहन राज्याचे उच्च वैद्यकीय शिक्षण तथा जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.दादासाहेब गायकवाड सभागृहात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्काराचे वितरण गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनिल कदम, आ. बाळासाहेब सानप, सभापती यतिन पगार, सुनीता चारोस्कर, मनीषा पवार, महापौर रंजना भानसी, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन्, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, जगाच्या पाठीवर कोठेही नसले तरी भारतात उघड्यावर शौचालयास बसण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या दिवसापासूनच स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली. शंभर टक्के हगणदारीमुक्त गावे झाली म्हणजे स्वच्छ भारत अभियान पूर्ण झाले, असे समजण्याचे कारण नाही. कारण जोपर्यंत घर, गावे संपूर्ण परिसर स्वच्छ होत नाही, स्वच्छ पाणी व जेवण मिळत नाही, सृदृढ आरोग्य नागरिकांना मिळत नाही, तोेपर्यंत स्वच्छ भारत अभियान यशस्वी होणार नाही. जलयुक्त शिवार अभियान ही लोकचळवळ झाल्यानेच यशस्वी झाले. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत अभियान ही लोकचळवळ व्हावी, त्यासाठी सर्वांनी स्वत:पासून सुरुवात करावी, असे आवाहन गिरीश महाजन यांनी केले. आमदार अनिल कदम यांनी सांगितले की, संपूर्ण स्वच्छता अभियानात सर्वांनी स्वत:पासून सुरुवात केल्याशिवाय अभियान यशस्वी होणार नाही. त्यासाठी पुरस्कारप्राप्त व पुरस्काराच्या स्पर्धेत असलेल्या सर्व ग्रामपंचायतींनी यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे. अध्यक्ष शीतल सांगळे यांनी जीवनमान उंचावण्यासाठी स्वच्छता अभियानाची आवश्यकता आहे. देश सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे. मात्र स्वच्छतेच्या बाबतीत काहीसा पिछाडीवर असल्याने महासत्ता होण्यासाठी सर्वांनी स्वच्छतेचा वसा घेतला पाहिजे, असे आवाहन केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी उपस्थिताना नवभारत निर्मितीची शपथ दिली.