खमताणे : ग्रामीण भागात शौचालय असुन सुद्धा वापर न करता लोक उघड्यावर शौचास जात आहेत. त्यामुळे लोटाबहादरांची संख्या वाढलेली दिसते. बागलाण तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर गावांत शौचालये बांधली आहेत. मात्र त्याचा लोक उपयोग करत नसल्याचे आढळते. तालुक्यातील कोणतेही पथक सक्रि य नसल्याने उघड्यावर शौचास बसणाऱ्यांंच्या संख्येत अधिकच वाढ होताना दिसत आहे. ज्यांनी स्वच्छतागृह बांधले आहे, असे लोक उघड्यावर शौचास जात आहेत. अनेक ठिकाणी शौचालयांचे सांगाडे अर्धवट स्थितीत दिसतात. केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना शौचालय उभारणीसाठी निधी दिला आहे. मात्र या शौचालयांचा वापर न करता लोक उघड्यावर शौचास जात असल्याने या स्वच्छता अभियानाचा गावोगावी फज्जा उडाला आहे. प्रत्येक गावात प्रशासनाकडून दिलेल्या उद्दिष्टाची पूती ग्रामपंचायतीकडुन झाली. मात्र, गावोगावी संबंधित ग्रामस्थांमध्ये जनजागृती न झाल्याने परिणाम दिसून येत नाही. काही ठिकाणी पाण्याअभावी नागरिक बाहेर जात असल्याचे बोलले जाते. तालुक्यात गावांमधील बहुतांश नागरिक हे घरात शौचालय असुनही त्याचा वापर करताना दिसुन येत नाहीत. त्यामुळे तयार झालेली शौचालये केवल शोभेची वस्तू बनली आहेत. काही शाळा, तलाठी कार्यालय व ग्रामपंचायतीच्या शौचालयाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. काही ग्रामपंचायतींना शौचालय उपलब्ध नाही.
गावोगावी स्वच्छता अभियानाचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 2:12 PM