मालेगाव : तालुक्यातील रावळगाव येथील गेल्या पाच वर्षात विविध विकासकामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी आजी- माजी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांतर्फे बुधवारी (दि. १५)कडकडीत बंद पाळण्यात आला.रावळगावी ग्रामपंचायतीमार्फत निकृष्ट दर्जाची कामे झाली असून, आदिवासी वस्तीमध्ये नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्या नसल्याने याबाबत चौकशी करावी, अशी मागणी शहर भाजपतर्फे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती; परंतु अद्याप कोणतीही चौकशी न झाल्यामुळे ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी बंद पाळला. १४ व्या वित्त आयोगातून स्मशानभूमी, चौक सुशोभिकरण, भूमिगत गटारी आदि कामे मंजूर होऊन ती पूर्ण करण्यात आली नाहीत. ग्रामपंचायत इमारतीचे काम अर्धवट स्थितीत असून, शुद्ध पाण्यासाठी कागदोपत्री फिल्टर बसविण्यात आले आहे. याप्रकरणी भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी नंदू पवार, ज्योत्सना जाधव, मंगल पाटील, कमळाबाई कानडे, जयवंताबाई वडक्ते, सुनीता अहिरे यांच्यासह भाजप शहराध्यक्ष राहुल कानडे यांनी केली आहे.
भ्रष्टाचाराविरोधात गाव बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 10:03 PM