पंचवटी : गेल्या काही दिवसांपासून पंचवटी गावठाण परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण दिवसाआड वाढत चालल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. पंचवटीत दररोज दहा ते पंधरा रुग्ण आढळून येत असल्याने पंचवटीतील गावठाण भाग कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे कोरोनाचा प्रसार व प्रचार झाल्याचा आरोप लोकप्रतिनिधी व नागरिकांनी केला आहे.गेल्या काही दिवसांपासून पंचवटीतील पेठरोड, फुलेनगर, रामनगर, हिरावाडी, भगवतीनगर, कोणार्कनगर, भराडवाडी, नाग चौक, सरदार चौक, त्रिमूर्तीनगर, कमलनगर भागात रोजच कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.प्रशासनाकडून खबरदारी म्हणून रुग्ण आढळून आलेल्या वसाहतीत प्रतिबंध क्षेत्र म्हणून औषध फवारणी केली जाऊन रुग्ण राहत असलेला परिसर सील केला जातो खरा, मात्र तरीदेखील त्या परिसरात रोज नागरिकांचा वावर असतो. बाजार समितीत दररोज जिल्ह्यातील शेकडो शेतकरी सकाळ, सायंकाळ भाजीपाला विक्रीसाठी येतात, तर भाजीपाला विक्रेते शेतमाल खरेदीसाठी येतात. मात्र कोणतेही फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीत पेठरोड व पंचवटी गावठाण भागातील अनेकजण रोजंदारी म्हणून काम करतात. त्यामुळे कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर संबंधितांनादेखील संसर्ग होत असून, त्यातूनच कोरोना रुग्ण वाढत आहेत.----------------फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णत: फज्जापंचवटी गावठाण परिसर असून, जुने घरे व वाडे लागून लागून आहेत. त्याचबरोबर पेठ रोडला शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी असल्याने आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करताना त्यात अनेक अडचणी येतात. परिणामी झोपडपट्टी भागात रुग्णसंख्या वाढत आहे.प्रशासनाने सर्व दुकाने सुरू केली असली तरी त्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णत: फज्जा उडाल्याचे दिसते. प्रामुख्याने मोबाइल दुकान, कापड दुकान, किराणा दुकान, दूध विक्री केंद्र या ठिकाणी नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
पंचवटीतील गावठाण बनले कोरोना हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 10:17 PM