पिंपळगाव बसवंत : नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची बदली रद्द करण्यात यावी यासाठी पिंपळगाव परिसरात शेतकऱ्यांनी गावागावात फलक लावले आहेत.
पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची नाशिक ग्रामीणला नेमणूक झाली. त्यानंतर त्यांनी विविध शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे बुडालेले पैसे मिळवून दिले. शेतकऱ्यांची देणी देण्यास नकार देणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. त्यामुळे कोरोना असला तरीही शेतकऱ्यांमध्ये समाधान होते. शेतकरी बिनधास्त शेतमाल विक्री करू लागले होते. मात्र, त्यांच्या बदलीची बातमी ऐकताच नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वतीने पोलीस अधीक्षकांची बदली रद्द करा, काम करणाऱ्या अधिकाऱ्याला अपमान नको न्याय द्या, असे फलक पिंपळगाव बसवंत शहरासह गावागावात झळकू लागले आहेत. शेतकऱ्यांचा शेतमाल घेऊन त्यांना पैसे न देता त्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या भावनेचा विचार वरिष्ठ पातळीवर घ्यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे. (१४ पिंपळगाव २)
-------------------
गुन्हेगारांवर वचक
सचिन पाटील यांची नाशिक ग्रामीण अधीक्षकपदी नियुक्ती झाल्यावर त्यांनी द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला आदी पिके खरेदी करून पैसे न देताच शेतकरी, नागरिकांची फसवणूक केलेल्यांविरोधात विशेष मोहीम राबविली. गुन्हेगारीलादेखील चाप बसविला. संबंधित आदेश त्यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते. थेट वरिष्ठांनीच आदेश दिल्याने सर्व यंत्रणा सक्रिय झाली. आजवर प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांच्या फाईलवरील धूळ झटकण्यात आली. त्यातून तक्रारदारांना न्याय देण्याचे काम नाशिक ग्रामीणच्या पोलीस ठाण्यात सुरू झाले.
140921\14nsk_2_14092021_13.jpg
१४ पिंपळगाव २