सिन्नर/खेडलेझुंगे : गावाच्या विकासात ग्रामसेवक हा महत्त्वाचा घटक आहे. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून ग्रामसेवकांच्या सुरू असलेल्या कामबंद आंदोलनामुळे ग्रामपंचायत स्तरावरील कामकाज ठप्प झाले आहे. गावपातळीवरील नागरिकांना या आंदोलनामुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.राज्यभरातील ग्रामसेवकांनी २२ आॅगस्टपासून कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. आपल्या मिनी मंत्रालयाच्या चाव्या गटविकास अधिकारी यांच्या हवाली करण्यात आल्या. अशातच सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकींची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यातच गावातील विकासाची कामे राबविण्याची कामे राबविणारे ग्रामसेवक संपावर गेल्याने विकासकामे ठप्प झाली आहेत. नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना शालेय दाखले, जन्म-मृत्यू दाखले, विविध प्रकारच्या योजनांसाठी लागणारी कागदपत्रे मिळत नसल्याने सिन्नर तालुक्यातील गावगाडा विविध कामांशिवाय ठप्प पडला आहे.ग्रामसेवकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन पुकारले; परंतु त्यांच्या आंदोलनाचा शासनस्तरावर विचार करण्यात आला नाही. त्यामुळे महाराष्टÑ राज्य ग्रामसेवक संघाने २२ आॅगस्टपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला. ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीच्या चाव्या गटविकास अधिकाऱ्यांच्या ताब्यात देऊन राज्यव्यापी कामबंदमध्ये सहभाग घेऊन कामबंद आंदोलन पुकारले. यासंदर्भात शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. यावर मंत्र्यांनी आश्वासन दिले; परंतु अंमलबजावणी झाली नाही.ग्रामसेवकांनीही जनतेचे आपल्या वाचून कुठलेही काम आडून राहू नये, विद्यार्थ्यांना शालेय अडचणी येऊ नये व गावाचा विकासथांबू नये; परंतु शासन दरबारी गेल्या कित्येक वर्षांपासून आमच्या मागण्या आम्ही मांडत आहोत; परंतु दखल घेतली जात नसल्याने आंदोलनकरण्यात आहे.
वेतन त्रुटीत सुधारणा करण्याची मागणी
ग्रामसेवक संघटनेच्या प्रलंबित मागण्यांमध्ये नोव्हेंबर २००५ नंतर नेमणूक झालेल्या ग्रामसेवक यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी, विस्तार अधिकारी पदे निर्माण करावी, ग्रामसेवक हे पद रद्द करण्यात येऊन या पदाला ग्रामविकास अधिकारी दर्जा देण्यात यावा, १५ हजार लोक संख्येपेक्षा जास्त ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत करावे, अन्य विभागांच्या कामांची व्याप्ती वाढावी, वेतन त्रुटीत सुधारणा करावी, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची कर्तव्यसूची ठरविण्यात यावी आदी मागण्यांसाठी ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन करण्यात आले आहे.
विविध कामांसाठी लागणारी अनेक प्रमाणपत्रे ग्रामसेवकांमार्फत दिली जातात; मात्र संप सुरू झाल्याने अनेक कामे रखडली आहेत. दैनंदिन कार्यालयीन कामकाजात व नागरिकांना महत्त्वाचे दाखले देण्यात अडचणी येत आहे. शासनाने ग्रामसेवकांच्या मागणीकडे लक्ष देऊन ग्रामीण भागात होणारे जनतेचे हाल थांबवावे व लवकरात लवकर तोडगा काढावा. त्यामुळे प्रशासकीय कामकाज सुरळीत होण्यास मदत होईल.गोपाल शेळके, तालुकाध्यक्ष, सरपंच सेवा संघटना, सिन्नर