संदीप भालेराव / नाशिक : विस्कळीत वीजपुरवठा आणि वीजेचे वाढते दर अशा दुहेरी संकटात सापडलेल्या ग्राहकांना महावितरणचा चांगलाच फटका बसत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील वीजेच्या संदर्भातील तक्रारींसाठी एखाद्या पोस्टमनसारखी गावकऱ्यांना लाईनमनची वाट पाहावी लागते. परंतु आता गावकऱ्यांची प्रतीक्षा संपणार असून शासनाने प्रत्येक गावात ग्राम विद्युत सेवक नियुक्त करण्याची तयारी चालविली आहे. महावितरणने प्रशासकीय खर्च कमी करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे भरतीचा प्रश्न दुरच आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कमी मनुष्यबळावर महावितरणला ग्रामीण भागात सेवा दयावी लागते. कर्मचारी कमी असल्याने वीज गळती अर्थात वीजचोरीला आळा घालणे शक्य होत नसल्याने गळतीचे प्रमाणही मोठे आहे. त्यातही वीजचोरी रोखण्यात आलेल्या अपयशामुळेही गळतीचे प्रमाण वाढतच आहे.कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे ज्या प्रमाणे वीजव्यवस्थेवर नियंत्रण मिळविणे कठिंण असते त्याप्रमाणेच ग्राहकांच्या तक्रारींकडे लक्ष देण्यासही कर्मचारी अपुरे पडतात. या प्रकरणामुळे गावातील विद्युत डीपी, भारनियम, वीजतारा, विद्युत खांब, वीजचोरी तसेच वीज जोडणीच्या बाबतीतील तक्रारी ऐकण्यासाठीच कर्मचारी नसल्याने ग्रामीण भागात महावितरण आणि ग्राहकांमधील संवाद कमी होत चालल्याचे देखील महावितरणच्या लक्षात आले आहे. यावर तोडगा म्हणून महावितरणने काही उपायोजना चालविल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ग्राम विद्युत सेवकाची संकल्पना पुढे आली आहे.
ग्राम विद्युत सेवक घेणार गावाची काळजी :नियोजन
By admin | Published: April 12, 2017 2:07 PM