पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत, तर संचारबंदी आणि उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत देखील गावाचा कारभार हाकणारे गावकारभारी ग्रामस्थांच्या प्रकृतीसाठी गावाच्या सुख-दुःखात सामिल होऊन आपली जबाबदारी पार पाडत आहेत.ग्रामीण भागात वाढत असलेला कोरोना संसर्ग रोखण्यासह लसीकरण वाढवण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार ग्राम दक्षता समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. त्यात गावचे सरपंच या समितीचे अध्यक्ष आहे, त्यामुळे कोरोनाचा गावात प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आणि कोरोनाला हद्दपार करण्यासाठी ग्रामपंचायतच्या गाव कारभाऱ्यांनी कंबर कसली आहे. त्यात अनेक गावे स्वतः बंद ठेवून जनता कर्फ्यू पाळले जात आहे. त्यात सरपंचांच्या पुढाकाराने ग्राम रक्षक, कुटुंब रक्षक, समाज रक्षक आदी मनापासून काम करीत आहेत. तसेच गावातील सामाजिक कार्यकर्त्यांना व तरुणांना संपर्क करून गावात कोणीही कोरोना बाधित होऊ नये यासाठी मदत कार्य सुरू केले आहे.माझें कुटुंब माझी जबाबदारी हे अभिनव उपक्रम राबवून गावातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी अंगणवाडी सेविका मदतनीस जिल्हा परिषद शिक्षक, कर्मचारी यांना मार्गदर्शन करून त्यांना सर्वेक्षनासाठी लागणारे साहित्य ग्रामपंचायतीला पुरवले जात आहे.शिवाय कोरोनाचे लक्षण आढळल्यास त्या रुग्णांना विलगिकरण कक्षात हलवले जात आहे.
गावात विलगीकरण कक्ष...कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कोरोना मुक्त गाव अभियानांतर्गत मुखेड ग्रामपंचायत मार्फत गावाच्या बाहेर १०० मीटरवर असलेल्या जिल्हा परिषद शाळेत सुरक्षिततेच्या दृष्टीने विलगीकरण कक्ष उभारण्यात आला असून त्याठिकाणी स्वतंत्र महिला कक्ष, पुरुष कक्ष त्यात टीव्ही फॅन, गादी, २४ तास लाईट, डसबिन, टॉयलेट आदी अत्यावश्यक त्यासुविधा दिल्या आहेत. यासाठी मुखेड ग्रामपंचायतचे सरपंच अमोल जाधव, उपसरपंच वृषाली पवार, लिलाबाई पाटील, प्रवीण जाधव, सागर शिंगाडे, शरद गायकवाड, अनिता गांगुर्डे, जयश्री नेहरे, छाया जाधव आदींसह ग्रामविकास अधिकारी कमलेश सावंत परिश्रम घेत आहेत.