नाशिक : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिक शाखेची पुनर्रचना करण्यात आली असून, नूतन कार्यकारिणी सोमवारी जाहीर करण्यात आली. शाखेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील, तर संत साहित्याचे अभ्यासक डॉ. दिलीप धोंडगे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा नाशिकमध्ये सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी कार्यान्वित होती; मात्र काही कारणास्तव तिचे कामकाज थंडावले होते. ‘मसाप’च्या कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांच्या पुढाकाराने आता या शाखेची पुनर्रचना करण्यात आली. यासंदर्भात कुसुमाग्रज स्मारकात सोमवारी बैठक होऊन नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यात जुन्या कार्यकारिणातील अध्यक्ष विनायकदादा पाटील व कार्याध्यक्ष कवी किशोर पाठक यांचे स्थान कायम ठेवण्यात आले आहे. उपाध्यक्षपदी प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, कार्यवाहपदी स्वानंद बेदरकर, कोषाध्यक्षपदी लोकेश शेवडे, तर सदस्यपदी अपर्णा वेलणकर, रमेश वरखेडे, मुक्ता चैतन्य, पीयूष नाशिककर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘मसाप’च्या नाशिक शाखेत पूर्वी ९० आजीव सभासद होते. त्यांपैकी आता सुमारे ७० ते ८० सभासद शहरात असून, नवीन सभासदत्वही दिले जाणार आहे. शाखेच्या वतीने शहरात साहित्याशी संबंधित कार्यक्रम घेतले जाणार आहेत. (प्रतिनिधी)
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या अध्यक्षपदी विनायकदादा पाटील
By admin | Published: February 03, 2015 1:29 AM