विंचूर : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारात नाफेड संस्थेमार्फत कृषी साधना शेतमाल उत्पादक सहकारी संस्थेकडून कांदा खरेदी सुरू करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा व इफ्कोच्या प्रथम महिला संचालक साधना जाधव यांनी दिली. नाफेडमार्फत खरेदी करण्यात आलेल्या कांद्याला कमीत कमी एक हजार ९०० तर जास्तीत जास्त २१०१ व सरासरी दोन हजार रुपये भाव मिळाला.सध्या येथील उपबाजार आवारात उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून कांदा काढणी होऊन बाजारात येणाऱ्या कांद्याला अपेक्षित दर नाही. त्यामुळे नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप, सचिव वाढवणे, बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक पंढरीनाथ थोरे, शिवनाथ जाधव, विंचूरचे सरपंच सचिन दरेकर, दीपक खैरे, गोपी जाधव यांसह कांदा व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कांदा खरेदीस प्रारंभ करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये बाजार समितीचे कामकाज बंद असल्याने कांदा उत्पादक अडचणीत सापडले आहेत. अशातच चांगले भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. कांद्याच्या भावात सुधारणा होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी विंचूर उपबाजार आवारात नाफेडतर्फे कांदा खरेदीला प्रारंभ करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
विंचूरला नाफेडमार्फत कांदा खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 3:27 PM