हनुमाननगर येथील दोन नागरिकांना १५ दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. दोघेही कोरोनाबाधित रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी परतले. त्यानंतर दोन तीन दिवसांनी त्यातील एकाचे डोके खुप दुखू लागले व डोळ्याला बुरशी येऊ लागली. त्यामुळे ते येथील कोविड सेंटरमध्ये तपासणी करण्यासाठी गेले असता त्यांना डॉक्टरांनी म्युकर मायकॉसिसचे लक्षण असल्याचे सांगून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आले. नाशिक येथील खाजगी रुग्णालयात डोक्याची शस्त्रक्रिया करून घरी सोडण्यात आले तर दुसरा रुग्ण कोरोनातून बरा झाल्यानंतर त्यांचेही दातात दुखू लागले, नाकाला झणझण्या येऊ लागल्या,घसा व कान दुखू लागल्याने त्यांना उपचारासाठी नाशिक येथे पाठवण्यात आले आहे. त्यांच्यावर म्युकर मायकोसिसचे उपचार सुरू आहेत. यामध्ये त्यांचे दोन दात काढले असल्याची माहिती त्यांच्या नातलगांनी दिली.
---------------
काय आहे म्युकर मायकॉसिस आजार
कोरोना झालेल्या रुग्णांना उपचार करताना जास्त प्रमाणात स्टेराँईडची इंजेक्शन दिल्यामुळे रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढते. त्यामुळे रुग्णाचे नाक ,डोळे दुखणे, नाक व तोंडाजवळ काळे ठिपके होणे, डोळे सुजणे,पापणी खाली पडणे,मोठ्या प्रमाणात डोके दुखणे, नाक व डोळ्या जवळ त्रास होणे अशी लक्षणे दिसून येतात.हा आजार शक्यतो अवयव प्रत्यारोपण, कोरोना, किडनी, मधुमेह उपचार घेतलेल्या रुग्णांमध्ये आढळतो .