नाशिक : काव्य हे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या ज्येष्ठ कवींच्या त्रयीचे योगदान खूप मोठे होते. संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्य वाचनाचे असंख्य कार्यक्रम करून त्यांनी कविता जनसामान्यांपर्यंत पोहोचवली. विंदा हे तर महाकवीच होते, त्यामुळेच त्यांनादेखील ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते, असे प्रतिपादन पदवीधर संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
सावानामध्ये गोविंद विनायक करंदीकर ऊर्फ 'विंदा करंदीकर' यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. विंदा हे मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक, भाषांतरकार व समीक्षक होते. विंदांनी मराठी काव्यमंजूषेत विविध घाटाच्या रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर घातली, त्यांनी मराठी बालकवितेची मुहूर्तमेढ रोवली. विंदाचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांच्याकडे झाले. इ.स. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठी भाषकांना परिचय झाला. हैदराबाद मुक्ती संग्रामात त्यांनी भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्वीकारले नाही. विंदांना २००३ या वर्षी बेचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम त्यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाकडे सुपूर्द केली होती. या रकमेच्या व्याजातून दरवर्षी ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावे अन्य भाषेतून मराठीमध्ये अनुवादित झालेल्या पुस्तकाला पुरस्कार द्यावा, असेही त्यांनी सुचविले होते. सावाना हे महाराष्ट्रातील सर्वात जुने व सांस्कृतिक केंद्र असलेल्या वाचनालयास भेट आणि विंदाच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्याचा योग आल्याबद्दल पदवीधर संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी कृतज्ञता व्यक्त करून विंदा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी केले. सांस्कृतिक सचिव प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे यांनी आभार मानले.