खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे, रूई, धारणगाव परिसरामध्ये द्राक्षबागा छाटणीला वेग आला आहे. संततधार सुरू असलेल्या पावसाने बागेवर डावण्या रोगाचे आक्रमण होणार असल्याने शेतकऱ्यांनी महागड्या औषध फवारणीवर भर दिला आहे. त्यामुळे द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झालेली दिसून येत आहे. पंधरवड्यापासून परिसरामध्ये मुसळधार पाऊस होत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकºयांचे तोंडचे पाणी पळाले आहे. द्राक्षबागा वाचविण्यासाठी हजारो रु पयांची औषधे खरेदी करावी लागत आहे. इतर पिकांसाठी परतीचा पाऊस जरी लाभदायक असला तरी या द्राक्षासारख्या महागड्या पिकांना तो तेवढाच धोकादायकही आहे. परतीचा पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा सर्वात जास्त फटका परिसरातील द्राक्ष उत्पादकांना बसणार आहे. पाऊस थांबल्यानंतर डावण्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होईल, असे मत द्राक्ष उत्पादकांनी व्यक्त केले आहे. पंधरा दिवसांपासून संततधार पाऊस होत असल्याने ज्या द्राक्षबागांची छाटणी झाली, ज्याची सुरू आहे अशा द्राक्षबागांना धोका निर्माण झाला असून, द्राक्ष उत्पादकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. पेठ, सुरगाणा, सटाणा, कळवण, गुजरात-महाराष्ट्र सीमेवरून मोठ्या प्रमाणावर मजूर वर्ग छाटणीसाठी दाखल झाला आहे. हे स्थलांतरित झालेले मजूर द्राक्ष बागांची छाटणी ते थिनिंगपर्यंतचे काम टेंडर पद्धतीने घेतात. साधारणत: १०-१२ लोकांचे एक-दोन कुटुंब द्राक्षबागाच्या रानासाठी २३ ते २५ हजार रु पयांपर्यंत मजुरी घेतात.याप्रमाणे ते एक किंवा एकापेक्षा जास्त शेतकºयांची कामे करतात. एक एकर द्राक्षबाग छाटणीसाठी व पेस्टिंगसाठी दोन दिवस लागतात. टेंडर पद्धतीशिवाय इतर मजुरांसाठी छाटणी व पेस्टिंगसाठी एकरी पाच हजार तर फेलकूट काढणे तीन हजार रु पये खर्च होणार आहे. ज्या शेतकºयांच्या द्राक्षबागांची छाटणी लवकर झालेली आहे, त्यांच्या बागांना फुलोरा आला आहे. त्या बागांचा फुलोरा संततधार पावसाने सडण्याची शक्यता आहे. त्यामुळे द्राक्षबागा वाचविण्यासाठी औषधांवरचा खर्च मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिसरामध्ये द्राक्षबागा असून, आॅक्टोबर छाटणी जोरात सुरू आहे. काही ठिकाणी काडी कवळी असल्याने सुरू असलेला पाऊस व हवामानाचा त्यावर परिणाम होऊ शकतो, असे द्राक्ष उत्पादकांनी सांगितले.वातावरणामुळे द्राक्षबागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे. सध्या बागा कोंब फुटण्याच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे पावसामुळे या बागांचे अधिक नुकसान होणार आहे. बºयाच ठिकाणी पेस्ट केलेली असून, ती परत करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. द्राक्षबागांसह सोयाबीन, मका, भाजीपाला, टमाटा आदी पिकांचे नुकसान होणार आहे. बदलत्या हवामानामुळे कीटकनाशक विक्रीच्या दुकानांत गर्दी दिसून येत आहे.
द्राक्षबागा ‘डावण्या’च्या कचाट्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 5:22 PM