देवळा (संजय देवरे)देवळा तालुक्याला लागून असलेल्या सटाणा, चांदवड व मालेगाव तालुक्यात कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे अद्यापपर्यंत कोरोनाचा शिरकाव नसलेल्या देवळा तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे. देवळा तालुक्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नसला तरी तालुक्यातील आरोग्य, पोलीस, महसूल यंत्रणा सतर्क असून, कोरोनाचा संसर्ग नागरिकांना होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. तालुक्यात स्थलांतरितांसाठी दोन निवारागृहाची व्यवस्था करण्यात आलेली असली तरी अद्याप त्याचा वापर करण्याची वेळ प्रशासनावर आलेली नाही.देवळा नगरपंचायत प्रशासनामार्फत नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असतानाही शहरात नागरिकांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे होणारे उल्लंघन मात्र चिंताजनक आहे. प्रशासनाने जिल्हा परिषद विद्यानिकेतन येथे कोरोना केअर सेंटर सुरू केले असून, तेथे ९० बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. उमराणा व मेशी येथे कोरोना केअर सेंटर प्रस्तावित आहेत. देवळा तालुक्यात आतापर्यंत बाहेरगावाहून आलेल्या १८० नागरिकांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली आहे. कंटेनमेंट झोनमध्ये असलेल्या भागातील काही नागरिक हे देवळा तालुक्यातील काही गावात आले असून, याबाबत संबंधित ग्रामपंचायत प्रशासन तसेच पोलीसपाटील यांच्याकडून कार्यवाही करण्यात टाळाटाळ केली जात असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचेही वातावरण आहे.