पंचवटी : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने शासनाने कठोर निर्बंध लागू करून कडक लॉकडाऊन केले आहे. त्यानुसार किराणा, भाजीपाला, मिठाई, बेकरी पदार्थ दुकानांना केवळ सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, पंचवटीतील अनेक दुकानदार दुकानाचे शटर बंद करून दुकानाबाहेर व्यक्ती बसवून येणाऱ्या ग्राहकांना पाहिजे त्या वस्तू देत असल्याने दुकानदारांकडून कोरोना नियम पायदळी तुडवले जात आहेत. तर दुसरीकडे पंचवटी कारंजा, मालेगाव स्टँड परिसरात काही हार्डवेअर दुकाने जीवनावश्यक वस्तूत मोडत नसतानाही सुरू असल्याने प्रशासनाची कारवाई मंदावल्याचे म्हटले जात आहे.
पंचवटी कारंजा परिसरात फळविक्री करणाऱ्या काही हातगाड्या तसेच फळविक्रीची दुकाने अकरा वाजल्यानंतरही सुरूच असतात. फळविक्री करणारे हातगाडीधारक एखाद्या इमारतीजवळ थांबून हातगाड्या उभ्या करतात, त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.
महापालिका तसेच पोलीस प्रशासनाने सुरुवातीला धडाक्यात कारवाई करत नियमित वेळेप्रमाणे दुकाने सुरू न ठेवणारे तसेच जीवनावश्यक वस्तूत न मोडणाऱ्या दुकानांवर कारवाई केली होती. मात्र, आता प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने कारवाई करणार कोण, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.