लासलगाव : परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असुन बाधित असलेले परंतु क्वॉरण्टाईन असलेले रूग्ण घराबाहेर फिरताना आढळत असल्याने प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून, कोणीही नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती लासलगावचे प्रशासक एस. के. सोनवणे व ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी दिली. लासलगाव येथील बाधित रुग्णांचे घराचा परिसर प्रतिबंधक क्षेत्र असून, पॉझिटिव्ह रुग्णांनी निगेटीव्ह रिपोर्ट आलेला असला अगर उपचाराने बरे झाल्यानंतरही नियमाप्रमाणे होम क्वॉरण्टाईन व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी मास्कशिवाय फिरू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निर्धारित वेळेनंतर दुकानदारांनी दुकाने चालू ठेवू नये. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील असेही सांगण्यात आले.