नाशिक : दुचाकी अपघात, चेनस्नॅचिंग, वाहनचोरी तसेच गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या आदेशावरून सुरू करण्यात आलेली वाहनतपासणी मोहीम दुसºया दिवशीही राबविण्यात आली़ स्थानिक पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखेच्या वतीने विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या या स्पेशल ड्राईव्हमध्ये शनिवारी (दि़१७) २५ हजार वाहनांची तपासणी करण्यात आली़ यावेळी नियमांचे उल्लंघन करणाºया ३ हजार ६२० हून अधिक वाहनधारकांकडून अठरा लाख १५ हजार रुपयांहून अधिक रकमेची दंडवसुली करण्यात आली़
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरणे गरजेचे आहे़ नाशिकमध्ये हेल्मेटसक्ती साधारण वर्षभरापूर्वीच लागू करण्यात आली असून, जानेवारीपासून पुणे शहरातही लागू केली जाणार आहे़ हेल्मेटमुळे अनेक गंभीर अपघातातही चालकाचे प्राण वाचले आहेत़ मात्र, असे असूनही हेल्मेट वापराबाबत टाळाटाळ केली जाते़ पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार शहरातील १३ पोलीस ठाणे हद्दीतील २६ ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी पोलिसांना शहरातील सामाजिक संस्था तसेच ट्रॅफिक अॅम्बेसिडर यांनी सहभाग घेऊन नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत प्रबोधन करून जनजागृती केली़
शहरातील विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या या कारवाईसाठी आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अधिकारी २५० कर्मचारी तर शहर वाहतूक विभागाचे दहा अधिकारी, २२५ कर्मचारी सहभागी झाले होते़ वाहतूक नियमांचे पालन तसेच हेल्मेट, सीट बेल्ट यांचा स्वत:च्याच सुरक्षिततेसाठी वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे़
दोन दिवसांत २८ लाखांची दंडवसुलीशहर पोलीस आयुक्तालय हद्दीत शुक्रवारपासून सुरू करण्यात आलेल्या या वाहन तपासणीतील दोन दिवसांत ४५ हजार वाहनांची तपासणी करण्यात आली असून, २८ लाख १५ हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे़ आर्थिक दंडवसुली हा उद्देश नसून वाहनधारकांची सुरक्षिततेस प्रथम प्राधान्य आहे़ मात्र, वारंवार आवाहन करूनही हेल्मेट परिधान न करणारे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने हा स्पेशल ड्राइव्ह घेण्यात आला आहे़८० टक्के दुचाकीस्वारांनी केला हेल्मेटचा वापरपोलीस आयुक्तालय हद्दीत शुक्रवारी राबविण्यात आलेल्या स्पेशल ड्राईव्हमध्ये पोलिसांनी कडक कारवाई केल्याने शनिवारी बहुतांशी दुचाकीचालक हे हेल्मेट घालून वाहन चालवित असल्याचे चित्र शहरात दिसून आले़ पोलिसांच्या या मोहिमेचा सकारात्मक परिणाम म्हणजे सुमारे ८० टक्के दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केले होते़ त्यामुळे शनिवारी पोलिसांना कारवाई करणे अधिक सोपे गेले़ दरम्यान, पोलिसांच्या कारवाईमुळे शहरातील बहुतांशी दुचाकी रस्त्यावरून गायब झाल्याचे चित्र होते़