नाशिक : उपमुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांपर्यंत मोठे नेते शहराच्या दौऱ्यावर... त्यांच्यासोबत आढवा बैठक अन् मोठ्या लोकप्रतिनिधीच्या कुटुंबातील लग्नसोहळा यामुळे रविवारदेखील जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचा धावपळीतच गेला. यादरम्यान, दिवसभर भेटीगाठी आणि बैठकांना हजेरी लावत असताना संध्याकाळी एका लग्नसोहळ्याला जेव्हा ते उपस्थित राहिले, तेव्हा त्यांना आपल्या खिशातील पाकिटच गायब असल्याचे लक्षात आले. नेमके पाकिट कोठे गहाळ झाले की कोण्या भुरट्या चोराने ते पळविले याचा रात्री उशिरापर्यंत उलगडा होऊ शकलेला नव्हता.लग्नसोहळ्यातून मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याच्या घटना नाशिककरांना नवीन नाही; मात्र एका बड्या राजकीय व्यक्तीच्या लग्न सोहळ्यात पोहचल्यानंतर जिल्हाधिकारी मांढरे यांना त्यांचे पाकिट खिशात नसल्याचे लक्षात आले आणि सुरक्षारक्षक व पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली. मांढरे यांचे पाकिट त्यांच्याकडून नेमके कोठे गहाळ झाले की कोणी चोरट्याने ते त्यांची नजर चुकवून चोरी केले? याविषयी साशंकता कायम आहे. मात्र शहरात याबाबत रात्री उशिरापर्यंत चर्चा रंगली होती. जिल्हाधिकाऱ्यांचे पाकिट हरविले अन् कोणाला नाही सापडले अशीच अवस्था झाल्याने आश्चर्य व्यक्त होत होते.रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्र अजीत पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार संभाजीराजे भोसले यांसारखे मान्यवर नाशिक शहराच्या दौऱ्यावर आले होते. पवार यांनी शासकिय अधिकारीवर्गासोब गंगापूर धरणालगत असलेल्या 'ग्रेप पार्क रिसॉर्टह' येथे आढावा बैठकही बोलाविली होती. या बैठकीला पोलीस महानिरिक्षक डॉ. प्रताप दिघावकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठक आटोपून पवार, भुजबळ यांच्यासह सर्वच वरिष्ठ शासकिय अधिकारी गंगापूररोडवरील एका लॉन्समध्ये आयोजित लोकप्रतिनिधींच्या कुटुंबातील लग्नसोहळ्याला हजर राहिले. यावेळी नववधु-वराला आशिर्वाद अन् शुभेच्छा दिल्यानंतर मांढरे यांनी आपला खिसा तपासला असता त्यांना पाकिट नसल्याचे लक्षात आले. यामुळे पाकिट नेमके गेले कोठे? असा प्रश्न त्यांना पडला. पाकिटावर गर्दीचा फायदा घेत कोण्या अज्ञात चोरट्याने लांबविले की ते त्यांच्याकडूनच गहाळ झाले? याबाबत मात्र रात्री उशिरापर्यंत उलगडा झालेला नव्हता.दरम्यान, मांढरे यांच्याशी याप्रकरणी संपर्क साधला असता त्यांनी मी आज अनेक ठिकाणी गेलो होतो, त्यामुळे पाकीट नेमके कोठे गहाळ झाले, याबाबत निश्चितपणे सांगता येणार नाही, असे सांगितले.
आश्चर्यच : जिल्हाधिकाऱ्यांचे पाकिट हरविले, कोणाला नाही सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 9:43 PM
लग्नसोहळ्यातून मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याच्या घटना नाशिककरांना नवीन नाही; मात्र एका बड्या राजकीय व्यक्तीच्या लग्न सोहळ्यात पोहचल्यानंतर जिल्हाधिकारी मांढरे यांना त्यांचे पाकिट खिशात नसल्याचे लक्षात आले आणि सुरक्षारक्षक व पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली.
ठळक मुद्देगहाळ झाले की चोरी याबाबत संभ्रमावस्था कायम