पावसाळा आला की, सगळीकडे तापाची साथ पसरते. अर्थात वातावरणातील बदल याला कारणीभूत असताे. तसेच पावसाळ्याच्या अखेरीस हवा थंड, तसेच वातावरण दमट असते. त्यावेळी शरीराला वातावरणातील बदलांशी जुळवून घ्यायला वेळ लागतो. जेव्हा शरीर या बदलाला प्रतिकूल होते, तेव्हा शरीराला ताप, सर्दी, खोकला यांसारख्या सामान्य आजारांना सामोरे जावे लागते. वातावरणातील बदलामुळे व्हायरल रुग्णात वाढ झाली असून, त्यात बालकांच्या अधिक संख्येमुळे काळजीत भर पडली आहे. सर्वसाधारपणे नाक गळणे, चोंदणे आणि खोकला अशी लक्षणे दिसून येत आहेत. मात्र, कोरोनाच्या काही लक्षणांमध्येदेखील या लक्षणांचा अंतर्भाव असल्याने घरातील बालकांना थोडा जरी सर्दी, ताप आला तरी चिंता वाढत आहे.
इन्फो
बालकांच्या तापांची लक्षणे
पावसाळ्यात होणाऱ्या तापाची काही खास लक्षणे असतात. तुम्हाला यापैकी कोणतेही लक्षणे आढळली तर तुम्ही आवर्जून उपचार घ्यावेत. श्वास घेण्यात अडचण, नाक बंद होणे, खोकला, अंगदुखी होणे, डोकेदुखी, स्नायुंमध्ये ताण निर्माण होणे, यांसारखी लक्षणे दिसू लागल्यास तत्काळ घरगुती उपचार घ्यावेत. त्रास वाढत गेला तर अजिबात वेळ न दवडता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
इन्फो
डेंग्यूसह चिकुनगुन्याचे संकट वाढले
कोरोना संपलेला नसताना साध्या व्हायरल तापाबरोबरच डेंग्यूसह चिकुनगुन्याचे संकटदेखील वाढले आहे. दमट हवा आणि साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढल्याने तापाच्या दोन प्रकारात तिपटीहून अधिक वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
कोट
तापाच्या रुग्णांच्या प्रमाणात गत महिन्यापासूनच मोठी वाढ झाली आहे. त्यात प्रामुख्याने डेंग्यू आणि चिकुनगुन्याच्या रुग्णांबरोबरच व्हायरल तापाचे प्रमाण अधिक आहे. या आजारांमध्ये बालके दगावण्याचे प्रमाण कमी असले तरी काही बाबतीत कोरोनासदृश लक्षणे असल्याने दक्षता घेण्याची गरज आहे.
डॉ. पंकज गाजरे, बालरोग विभाग प्रमुख