नाशिक : श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या देश-विदेश स्वामी सेवा अभियानाच्या व दुबई येथील सेवा केंद्राच्या माध्यमातून दुबई येथे श्री स्वामी समर्थ विश्वशांती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवासाठी भारतातून सुमारे ३४ देश-विदेश अभियान प्रतिनिधींनी उपस्थिती नोंदविली. तसेच दुबई येथील स्थानिक भाविक सेवेकरी उपस्थित होते. सर्वप्रथम भूपाळी, आरती, त्यानंतर गणेश व चंडी यागाचे आयोजन केले गेले. बालसंस्कारच्या चमूने स्वामी महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठचे नितीन मोरे, दुबई येथील प्रतिनिधी रवि काळे, उद्योजक मोहम्मद अब्दुला रहीम अहमद आदिंसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.पादुकापूजन सोहळामुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांसमवेत पवित्र कुराण ग्रंथाचे पूजन करण्यात आले. या पादुका पूजनाचा स्थानिक मुस्लीम भाविकांनीदेखील लाभ घेतला. तसेच सेवामार्गातील प्रतिनिधी इश्तियाक अहमद व टॉमी अलुकाल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नितीन मोरे यांनी मानवी जीवनातील विविध पैलूंची सेवामार्गाशी कशी सांगड घातली आहे, असे आपल्या हितगुजातून स्पष्ट केले. यावेळी सेवामार्गाच्या विविध विभागांचे मार्गदर्शन स्लाईड शो च्या माध्यमातून करण्यात आले.
स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने दुबई येथे विश्वशांती महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 1:22 AM