नाशिक : चार दिवसांपूर्वी म्हणजेच वसुबारसच्या दिवशी नाशिक शहराजवळ भगूर येथे अज्ञात व्यक्तीने गो वंशाची कत्तल करून फेकल्याची घेतल्याची घटना घडली होती. त्याचा अद्याप तपास न लागल्याने विश्व हिंदू परिषद आणि विविध समूहाचारी संघटनांच्या वतीने आज भगूर पोलीस ठाण्यावर हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला. पोलीस तपासात अपयश येत असल्याने येत्या सोमवारी (दि 31) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. काही समाजकंटकांनी समाजात दुही निर्माण व्हावी यासाठी हे कृत्य जाणीवपूर्वक वसुबारसच्या दिवशी केल्याचा या संघटनांचा आरोप आहे.
वसुबारसच्या दिवशी हिंदुत्ववादी संघटनांनी रोष व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक करून कारवाई करू असे आश्वासन दिले होते. मात्र चार दिवसात कोणत्याही प्रकारचा तपास लागलेला नसून अद्याप आरोपींना अटक झाली नाही. महिनाभरापूर्वी दोन वाडे या गावात गोवंशाची कत्तल करून नेणारा ट्रक सापडला होता, त्यातील आरोपीही अद्याप सापडलेले नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आज आक्रोश मोर्चा काढला. विहिपचे नेते एकनाथ शेटे तसेच अन्य हिंदुत्ववादी संघटनांचे नेते मोर्चात उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"