नाशिक : कुंभमेळ्यात दोन महिन्यांपासून सुरू असलेले वादविवाद आता आणखी तीव्र झाले असून, त्याचा प्रत्यय आज खुद्द मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनाही आला. उज्जैनमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचे निमंत्रण देण्यासाठी आलेल्या चौहान यांना दिगंबर आखाड्याने महंत ग्यानदास यांच्याविरोधात पत्रच सुपूर्द केले. यामुळे उज्जैनचा कुंभमेळाही वादांनी गाजण्याची चिन्हे आहेत. कुंभमेळ्याच्या प्रारंभापासूनच अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत ग्यानदास व दिगंबर आखाडा यांच्यात शीतयुद्ध सुरू होते. प्रथम शाहीस्नानाच्या काही दिवस आधी या वादाने उग्र रूप धारण करीत दिगंबर आखाड्याने महंत ग्यानदास यांना आखाडा परिषदेचे अध्यक्ष मानण्यास नकार देत त्यांच्यावर बहिष्कार टाकला. त्यानंतर तिन्ही पर्वण्या काही वादविवादांचा अपवाद वगळता सुरळीत पार पडल्या. आता कुंभमेळा संपल्यानंतर मात्र हा वाद पुन्हा उफाळून आला आहे. येत्या एप्रिल महिन्यात मध्य प्रदेशातील उज्जैन येथे सिंहस्थ कुंभमेळा होत असून, त्याचे निमंत्रण देण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान नाशकात दाखल झाले. साधुग्राममध्ये येताच त्यांनी प्रथम निर्वाणी आखाड्यात जाऊन श्री महंत ग्यानदास यांना निमंत्रण दिले. त्यानंतर दिगंबर आखाड्यात जाऊन त्यांनी श्री महंत कृष्णदास, श्री महंत रामकिशोरदास शास्त्री यांना निमंत्रण दिले; मात्र ते स्वीकारताच ‘सध्या आखाडा परिषदेचा कोणीही अध्यक्ष नाही. मुळात आखाडा परिषदच अस्तित्वात नाही. उज्जैन प्रशासनाने तिन्ही अनी आखाड्यांशी थेट संपर्क साधावा. काही जण स्वयंघोषित अध्यक्ष असून, त्यांच्यावर विश्वास ठेवू नये’ असे दिगंबर आखाड्याच्या महंतांनी मुख्यमंत्र्यांना बजावले. त्यावर काय बोलावे हेच चौहान यांना क्षणभर सुचले नाही. मग मात्र त्यांनी मान डोलावत कुंभमेळा निर्विघ्न पार पडावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.दरम्यान, यावेळी दिगंबर आखाड्याच्या वतीने चौहान यांना आपल्या श्री महंतांची यादीही सुपूर्द करण्यात आली. (प्रतिनिधी)
चौहानांसमोर बेदिलीचे दर्शन
By admin | Published: September 20, 2015 11:36 PM