नाशिक : पावसाळा व सिंहस्थ कुंभमेळा दोघेही तोंडावर येऊन ठेपलेले असताना अजूनही पाहिजे त्या प्रमाणात कामे पूर्ण झालेली नाहीत, कधी पूर्ण होतील याविषयी कोणीच शाश्वती देत नसल्याचे पाहून राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी नाराजी व्यक्त करताच, त्यांच्या उपस्थितीतच ठेकेदाराला तंबी देण्यात अधिकाऱ्यांनी धन्यता मानली. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या तयारीचा आढावा घेण्यापूर्वी क्षत्रिय यांनी सकाळी साडेसात वाजताच तपोवनातील साधुग्रामला भेट दिली. या ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या कार्यालयात बसून अगोदर क्षत्रिय यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांकडून साधुग्राम व तेथे देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती जाणून घेतली. साधारणत: अर्धातासानंतर त्यांनी कामांची पाहणी करण्यास सुरुवात केली. भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या शौचालयांची तसेच पोलिसांकडून उभारण्यात येणाऱ्या टेहळणी टॉवरची पाहणी केली. साधुग्राममध्ये आखाडे, खालशांसाठी प्लॉट मार्किंग व अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज यांची माहिती जाणून घेतल्यानंतर अधिकाऱ्यांचा ताफा घेऊन त्यांनी नवीन घाटांच्या कामाची पाहणी केली.
तपोवनातील साधुग्रामला भेट
By admin | Published: May 30, 2015 12:07 AM