नाशिक : मुंबईतील फोर्ड येथील नौसैनिक तळावर भारतीय नौसेनेकडून आय.एन.एस. चेन्नई हे लढाऊ जहाज शालेय विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. नाशिकमधील देवळाली कॅम्पच्या विद्यार्थ्यांनी लढाऊ जहाजाला भेट दिल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला.शालेय विद्यार्थ्यांना भारतीय सैन्यदलाची माहिती व्हावी व सैन्यदलात सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी मुंबई येथील फोर्ड परिसरातील नौसेनेच्या तळावर आय. एन.एस. चेन्नई हे लढाऊ जहाज विद्यार्थ्यांना दाखवून त्याची सविस्तर माहिती देण्यात आली. मुंबईमधील शाळांच्या हजारो विद्यार्थ्यांनी नौदलाचा तळ फुलून गेला होता. या उपक्रमात नाशिक येथील देवळाली कॅम्पच्या सरस्वती एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा दिलनवाज वारियावा व सचिव अल्मित्रा पटेल यांनी संस्थेच्या देवळाली हायस्कूलच्या एन.सी.सी., राष्ट्रीय हरितसेना, इतिहास-भूगोल, विज्ञान मंडळ व शाळेच्या प्रिफेट कौन्सिल आदींच्या दीडशे विद्यार्थ्यांना सहभागाची संधी उपलब्ध करून दिली. नौसेना तळावर विद्यार्थ्यांना आय.एन.एस. चेन्नई हे लढाऊ जहाज प्रत्यक्ष दाखविण्यात येऊन त्या कार्यपद्धतीची संपूर्ण माहिती देण्यात आली. जहाजाची अंतर्गत रचना तसेच सुपरसॉनिक ब्रह्मोस मिसाइल्स, पाणबोटविरोधी बराक मिसाईल्स व रडार सिस्टीम, लहान एन. एम. जी. गन्स असून हे जहाज आणि जैविक व रासायनिक हल्ल्यात अत्यंत उपयोगी जहाज असल्याची माहिती जहाजावरील नौसेनेच्या अधिकाऱ्यांनी दिली.आय.एन.एस. चेन्नई या लढाऊ जहाजाच्या भेटीनंतर विद्यार्थ्यांना गेट वे आॅफ इंडिया तसेच वारसा स्थळ असणारे ताज हॉटेलदेखील दाखविण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या उपसचिव अश्रफी घडियाली, शाळेचे मुख्याध्यापक हेमंत मोजाड, एनसीसीचे प्रमुख योगेश्वर मोजाड, हरित सेनेचे प्रमुख किशोर शिंदे, भूगोल जिओ क्लब प्रमुख वैशाली देसाई, स्मिता पाटील, रु पाली भामरे, अल्मास, अॅलेस आदींनी सहभाग घेतला.
युद्धनौकेला भेट दिल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 11:16 PM