नाशिकरोड : विहितगाव स्मशानभूमीजवळ पिण्याच्या पाण्याची मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. जलवाहिनीची तत्काळ दुरुस्ती करावी तसेच परिसरात तीन दिवसांपासून असणारी पाणीटंचाई दूर करावी, या मागणीसाठी संतप्त महिलांनी विहितगाव पुलावर अचानक रास्ता रोको आंदोलन केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे यांनी मध्यस्ती केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त विहितगाव येथील पुलाजवळ नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. नवीन पुलाच्या जागेवर पिण्याच्या पाण्याची मोठ्या व्यासाची मुख्य जलवाहिनी आहे. या जलवाहिनीच्या स्थलांतराचे काम मागील तीन दिवसांपासून सुरू आहे. शनिवारी रात्री २ वाजेपर्यंत अभियंता व कर्मचाऱ्यांनी स्थलांतर व दुरुस्तीचे काम केले. मात्र रविवारी सकाळी ६ वाजता पाण्याच्या तीव्र दाबाने मुख्य जलवाहिनी फुटली. मुख्य जलवाहिनी फुटल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसू लागले. पाणीपुरवठा विभागाने तातडीने पाणीपुरवठा बंद केला. यावेळी संतप्त महिला व नागरिकांनी एकत्र येत मुख्य जलवाहिनीचे काम वेळेत पूर्ण करावे व पाणीटंचाई दूर करावी, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन सुरू केले.अचानक रास्ता रोको आंदोलन झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. येथील सौभाग्यनगर, विहितगाव, बागुलनगर, राजवाडा, गुलाबवाडी, चंदनवाडी आदि भागांतील महिलांना तीन दिवसांपासून पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. महापालिका प्रशासनाने टँकरची व्यवस्था पुरेशा प्रमाणात केली नसल्याचा आरोप केला. आंदोलनात संगीता पारेस्कर, संगीता मथ्थ्यू, शैला नाईक, सविता भालेराव, नर्गीस शेख, छाया भालेराव, रोहिणी भालेराव, सुनंदा भालेराव, रमाबाई खरात, छाया भालेराव, शीला भालेराव, गीता भालेराव, निता भालेराव, तुळसाबाई भालेराव, तुषार भालेराव, सचिन भालेराव, असिप सय्यद, सुमन दोंदे, आतिष भालेराव, रमाकांत श्रीसंत आदिंनी सहभाग घेतला. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्यासोबत भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. पिण्याच्या पाण्याचे टँकर पाठविण्याची व्यवस्था तसेच जलवाहिनीचे काम तातडीने सुरू करण्याचे आश्वासन महापौर मुर्तडक व उपमहापौर बग्गा यांनी दिले. आश्वासनानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक न्याहाळदे यांनी आंदोलनकर्त्या महिलांची समजूत काढत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. (प्रतिनिधी)
विहितगाव पुलावर अचानक रास्ता रोको आंदोलन
By admin | Published: June 15, 2015 1:58 AM