कळवण : कसमादे भागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कळवणकर जनतेचे आराध्यदैवत असलेल्या श्री विठोबा महाराज मूर्तीच्या मिरवणुकीने यात्रेला सुरुवात झाली. कीर्तन केसरी संजय धोंडगे यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर आयोजित केलेल्या महाप्रसादाचा कळवण व पंचक्रोशीतील दहा हजार भाविकांनी लाभ घेतला. श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सव, श्री विठ्ठल देवस्थान ट्रस्ट व कळवण ग्रामपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या यात्रोत्सवाला दि. २४ जानेवारीपासून सुरुवात झाली. शुक्रवारी काल्याच्या कीर्तनाने कीर्तन महोत्सवाची सांगता करण्यात आली. यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.कळवण शहरातील व्यावसायिक, उद्योजक, नोकरदार, विविध संस्था व सर्वसामान्य जनतेने आर्थिक मदतीचा हात पुढे सरसावल्याने आनंद द्विगुणीत करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे श्री विठोबा महाराजांच्या रथाची भव्य मिरवणूक, विविध कार्यक्रमांचे आयोजन, कुस्त्यांच्या विराट दंगलीचे आयोजन करून महाराष्ट्र व शेजारील राज्यातील नामवंत पहिलवान यांना आमंत्रित करण्यात आल्याने कुस्त्यांची दंगल यात्रा महोत्सवाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. शनिवारी रात्री नऊ वाजता रंगारंग लोकनाट्य तमाशा, मनोरंजनाचा कार्यक्रम गांधी चौकात संपन्न झाला असून, हजारो रु पयांच्या कुस्त्यांचा फड दिनांक १ व २ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन ते सात वाजेच्या दरम्यान कै. राजाराम लक्ष्मण पगार कुस्ती मैदानावर रंगणार आहे. यात महाराष्ट्रातील व शेजारील राज्यातील नामवंत पहिलवान यांना आमंत्रित करण्यात आले असून, ते सहभागी होणार आहेत. यंदा यात्रा समितीच्या वतीने कळवण केसरीसाठी एकवीस व एकतीस हजार रु पयांची कुस्ती होणार आहे, रविवारी होणाऱ्या कुस्ती दंगलीचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या हस्ते, तर अध्यक्षस्थानी आमदार जे. पी. गावित राहणार आहेत. कमको अध्यक्ष रवींद्र शिरोरे व रमेश शिरसाठ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर मंगळवार, (दि. २) ला कुस्ती दंगलीचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार व जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती शैलेश पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती अध्यक्ष राजेंद्र पगार व खजिनदार रवींद्र पगार यांनी दिली.
विठोबा महाराज यात्रा : दहा हजार भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
By admin | Published: January 31, 2015 11:38 PM