नाशिक : सकाळपासून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लागलेल्या रांगा, मंदिरांसह घरोघरी सुरू असलेला विठूनामाचा गजर, टाळ-मृदुंगाचे निनादणारे स्वर, देवपूजा, दर्शनानंतर खिचडी, फळे आदींच्या सेवनाद्वारे केलेला सात्विक उपवास अशा भक्तिमय वातावरणात शहरात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. शहरातील विठ्ठल मंदिरे रोषणाईने न्हाऊन निघाली होती. शहरातील कॉलेजरोड, गंगाघाट, खोडेनगर, सिडको, सातपूर, मेरी, नाशिकरोड आदी ठिकाणच्या मंदिरांमध्ये आबालवृद्ध भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली आहे. मंदिरांमध्ये सकाळपासून विधिवत पूजा करण्यात आली. विठ्ठलाला फुले, तुळशीच्या माळा, हार, फळे आदी अर्पण करण्यात आले. विठ्ठल-रुक्मिणीची आकर्षक वेशभूषा करून दागिन्यांसह सजावट केल्याने साजिरे रूपाचे भाविकांनी डोळे भरून दर्शन घेतले. गाभाऱ्यातही भरगच्च फुलांची सजावट करण्यात आली होती. जुन्या तांबट लेन परिसरातील विठ्ठल मंदिरात विशेष सजावट करण्यात आली होती. तुलसीदल व तुळशीच्या माळा देवाला अर्पण केल्या. पायले कुटुंबाच्या वतीने आकर्षक वस्त्रजोडी अर्पण करण्यात आली. दिवसभर भाविकांनी खिचडी, भगर, कालवण, रताळ्याच्या चकल्या, केळी, सफरचंद आदी फळांसह उपवास केला. मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये ठिकठिकाणी भाविकांनी उपाहारगृहे, फास्टफूड सेंटर आदी ठिकाणी उपवासाची जिलेबी, गुलाबजाम, खीर, मिठाई, साबुदाणा वडा, उपवासाची कचोरी, फ्रुट सलाड आदींचा आस्वाद घेतला. आषाढी एकादशीनिमित्त शहरातील कौमुदीप्रेरित महिला संघाच्या वतीने महिलांनी दिंडीचे आयोजन केले होते. प्रारंभी कौमुदी परिवाराच्या वतीने नामदेव विठ्ठल मंदिरात आरती करण्यात आली.शहरातील कापड बाजारातील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाच्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले.उपनगर परिसरातील शांतीनगर विठ्ठल मंदिरात बागेश्रीनिर्मित ‘कानडा राजा पंढरीचा’ हा अभंग गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.नाशिकरोड येथे ‘विठ्ठल.. विठ्ठल.. विठ्ठला.., पांडुरंग विठ्ठला’च्या जयघोषामध्ये परिसरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले.
विठू माउली तू माउली जगाची...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 1:17 AM