इंदिरानगर : वडाळागावातील जनावरांच्या गोठ्यांमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, महापालिकेने गोठेधारकांना फक्त नोटिसा बजावून फक्त सोपस्कार पार पाडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वडाळागावात सुमारे ४५ वर्षांपूर्वी शेतीव्यवसाय होता. शेतकरी व हातावर काम करण्याची वस्ती म्हणून गावाची ओळख आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी शेतीला जसजसा भाव मिळत गेला तसतशी जमीन विकली गेली. गावात झीनतनगर, मेहबूबनगर, अण्णा भाऊ साठेनगर यांसह विविध उपनगरे अस्तित्वात येऊन विस्तार वाढतच चालला आहे. सुमारे बारा हजार लोकवस्ती असलेले गाव असून, सुमारे दहा वर्षांपूर्वी एक ते दोन जनावरांचे गोठे होते. आता त्यांची संख्या तीस ते पस्तीसच्या घरात गेली आहे. प्रत्येक जनावरांच्या गोठ्यामध्ये सुमारे चारशे ते पाचशे जनावरे आहेत. त्या जनावरांच्या मलमूत्राचा प्रश्न निर्माण होत असल्याने बहुतेक गोठेधारकांनी सर्रासपणे जनावरांचे मलमूत्र गोठ्याबाहेर खड्डा करून किंवा बाहेर सोडून दिले आहे. या संदर्भात महापालिकेला निवेदन देऊनसुद्धा अद्यापी जनावरांचे गोठे हटवले जात नाही. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी गावात विषाणूजन्य आजाराचा फैलाव झाला होता त्यामुळे गावात रुग्णांची संख्या वाढली होती. असे असतानाही कोणती कारवाई होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.पाणी रस्त्यावर वाहतेकाही गोठेधारकांनी मलमूत्र नाल्यांमध्ये सोडून दिले आहे. हे नाले विविध कॉलनी आणि सोसायट्यांमधून जात असल्याने त्यातून घाण आणि दुर्गंधी पसरली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने पावसाचे पाणी नाल्यात जाऊन मलमूत्र दुतर्फा रस्त्यावर वाहत असते.
वडाळागावातील जनावरांच्या गोठ्यांमुळे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 12:52 AM