त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खेड्या-खेड्यांत, वाडी-पाड्यांत आपल्या मालाची विक्री व्हावी या उद्देशाने भाजी विक्रेत्यांनी एक वेगळीच शक्कल लढवून आपल्या मालाची विक्री सुरू केली आहे. बाजारपेठेत आपल्या मालाला योग्य व रास्त भाव मिळत नसल्यामुळे देवगांव परिसरातील भाजीपाला विक्रेत्यांनी गाव-खेड्याकडे मोर्चा वळवून गावोगाव भाजीची गाडी फिरवून त्यामध्ये साऊंडच्या माध्यमातून मोबाईलच्या साहाय्याने मोठ्या आवाजात गाणे लावून विक्री केली जात आहे.
महिलांना गोळा करण्यासाठी " सई बाई गं बाई ", गौळणी, भारुड, पोवाडे इ गाण्यांचा वापर करून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. भाजीच्या गाडीमध्ये कांदा, बटाटे, लसूण, वांगे, फ्लॉवर, कोबी, वाल, मटार, ढोबळी मिरची, लवंगी मिरची, गाजर, पालक, शेपू, मेथी आदी ताज्या भाज्यांसह फळेही असल्यामुळे बालकांचाही गलका वाढतो. आठवड्यातून दोन दिवसांआड भाजीची गाडी येत असल्यामुळे ताजा भाजीपाला घेण्याकडे महिलांचा ओघ वाढतो. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला " सई बाई " ची प्रतीक्षा करत गाडीभोवती गलका करत असतात. ग्रामीण भागातील महिला कोरोनामुळे वर्दळीच्या बाजारपेठेत न जाता गावांमध्ये येणाऱ्या ताज्या-तवान्या भाजीपाल्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे स्थानिक भाजीपाला विक्रेत्यांसह ग्राहकांचीही अडचण दूर होत आहे.