महापौर : आपत्कालीन स्थितीसाठी मनुष्यबळनाशिक : शहरात पूरस्थिती अथवा अन्य कोणतीही आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यानंतर गृहरक्षक, नागरी संरक्षण दलाचे जवान, महाविद्यालयांमधील एनसीसी आणि एनएसएसचे विद्यार्थी, माजी सैनिकांसह प्रशिक्षित स्वयंसेवक यांची मदत घेण्याचे महापालिकेने ठरविले असून, या सर्वांचा विमा काढण्यात येणार असल्याची माहिती महापौर अशोक मुर्तडक यांनी दिली.गेल्या चार दिवसांपासून शहरात अतिवृष्टीमुळे गोदावरीसह नासर्डी, वालदेवी नदीला पूर आलेले आहेत. यामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन स्थितीत महापालिकेची यंत्रणा मदतकार्य करत असली तरी अपुऱ्या मनुष्यबळामुळे मर्यादा पडत आहेत. अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध व्हावे याकरिता महापौर अशोक मुर्तडक यांनी शनिवारी शहरातील एनसीसी, एनएसएसचे प्रमुख, नागरी संरक्षण दलाचे प्रमुख व माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, सुरक्षा रक्षक बोर्डाचे प्रतिनिधी यांची बैठक बोलाविली होती. सदर बैठकीत सर्व स्वयंसेवकांना आपत्कालीन स्थितीत साहाय्य करण्याचे आवाहन महापौरांनी केले. अशा ठिकाणी काम करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचा विमा महापालिकेच्या वतीने काढण्यात येणार असून, त्याबाबतची आर्थिक तरतूद चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
मनपा काढणार स्वयंसेवकांचा विमा
By admin | Published: August 07, 2016 12:43 AM