महाराष्ट्रातील काश्मीर समजल्या जाणाऱ्या भंडारदरा परिसरात निसर्गाचा अद्भुत नजारा म्हणून साम्रद येथील सांदन दरीला ओळखले जाते. टाकेदपासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर असलेली ही दरी अशिया खंडातील दुसºया क्रमांकाची दरी म्हणूनही परिचित आहे. अशा या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या दरीचा आनंद घेण्यासाठी देश-परदेशातील पर्यटकांची सांदनदरीत नेहमीच गर्दी असते. पण या पर्यटकांमुळे येथे प्रचंड प्लॅस्टिकच्या बाटल्या,वेफर्स कागद, सिगारेटची पाकीटे, मद्याच्या बाटल्यांचा कचरा याठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असतो. तसेच दरवर्षी उन्हाळ्यात या सांदण दरी परिसरात पशू-पक्ष्यांना प्यायला पाणीही मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होते. त्यामुळे अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी प्राचार्य दिलीप रोंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली साम्रद व सांदण दरी परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. साम्रदच्या रोहिदास बांडे या युवकांने सांदनदरीत कोणकोणत्या ठिकाणी पाणवठे करणे गरजेचे आहे याचे स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत सांदन दरीतील संपूर्ण कचरा दरीच्या वर आणत त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली . तसेच उन्हाळ्यात वन्यजीवांवर पिण्याचे पाणी शोधण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ येऊ नये म्हणून स्वयंसेवकांनी सांदणदरीत विविध ठिकाणी पाणवठे तयार केले. ते पाणी वाहून जाणार नाही याची दक्षताही घेतली. त्यामुळे उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांना याठिकाणी पाणी पिता येईल व पाण्याअभावी त्यांची संख्याही घटणार नाही. नवीन पाहूणे पक्षी भंडारद-याच्या अभयारण्यात आश्रयास येतील हेच या स्वयंसेवकांनी शिबीराद्वारे दाखवून दिले. वनक्षेत्र अधिकारी डी. डी. पडवळे, गुलाब दिवे, प्राचार्य रोंगटे, कार्यक्र म अधिकारी राजेंद्र चव्हाण, प्रा. महेश पाडेकर , प्रा.अनुसया वाळेकर, साम्रद येथील सरपंच मारु ती बांडे , उपसरपंच प्रा. त्र्यंबक बांडे, नामदेव बांडे, रोहिदास बांडे यांचे स्वयंसेवकांना मार्गदर्शन लाभले. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील ५० स्वयंसेवकांना ग्रामपंचायत साम्रद यांनी वनभोजनाचा आनंद दिला.
वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी सरसावले सेवायोजनेचे स्वयंसेवक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 5:55 PM