नाशिकरोड : सिंहस्थाच्या नावाखाली भुसावळ विभागाचे रेल्वे प्रबंधक महेशकुमार गुप्ता यांनी मतदानाच्या दिवशीच नाशिकरोड रेल्वेस्थानकाला भेट दिल्याने त्यांच्या दिमतीला असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानापासून वंचित रहावे लागले. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रशासकीय पातळीवर उपाययोजना केली जात असतांना गुप्ता यांच्यामुळे अनेकांना मतदानाचा हक्क बजविता आला नसेल तर गुप्ता यांच्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गुप्ता हे वारंवार नाशिकरोडला येऊन सिंहस्थाचे कारण पुढे करीत शॉपिंग करीत असल्याने त्यांच्या या जाचाला येथील कर्मचारीही वैतागले आहेत. बुधवारी गुप्ता यांनी कहरच केला. सर्वत्र मतदान सुरू असतांना गुप्ता हे नाशिकरोड रेल्वेस्थानकावर दाखल झाले. प्रबंधक गुप्ता व त्यांची पत्नी यांचे नाव मतदार यादीत असले तर त्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला की नाही असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. मतदानाचा सर्वांनी हक्क बजावून लोकशाही बळकट करावी, पवित्र मतदान निर्भयपणे करावे यासाठी केंद्र व राज्य शासन, निवडणूक आयोग, विविध खाजगी संस्थांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून शासनासोबत खाजगी कंपन्या, बॅँका, दुकाने आदि सर्व सुट्टी देतात. मात्र भुसावळ विभागाचे रेल्वे प्रबंधक महेशकुमार गुप्ता यांना नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या विभागाचा इतका लळा (?) लागला आहे की त्यांनी ऐन मतदानाच्या दिवशीही नाशिकरोड रेल्वे स्थानक व सिंहस्थ कामाचा पाहणी दौरा केला.गुप्ता हे पत्नीसह मंगळवारी रात्री तीन वाजेच्या सुमारास विदर्भ एक्स्प्रेसला स्पेशल कोचने नाशिकरोडला दाखल झाले. मतदानाच्या दिवशी सकाळी गुप्ता हे त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी गेल्याचे वृत्त आहे. सकाळी ९.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत गुप्ता यांनी रेल्वे स्थानक, वाहनतळ, चौथ्या प्लॅटफॉर्मचे नवीन पादचारी पुलांचे सुरू असलेले काम, करवा यांच्या इमारतीतील खाजगी जनरल बुकींग काऊंटर आदि ठिकाणची पाहणी करून सुचना केल्या. त्यानंतर गुप्ता हे नाशिकला गेले होते. नंतर सायंकाळी सेवाग्राम एक्स्प्रेसला स्पेशल कोचने भुसावळला रवाना झाले. गुप्ता यांच्या दौऱ्यामुळे मनमाडहून काही अधिकारी-कर्मचारी आले होते. ऐन मतदानाच्या दिवशी पाहणी दौरा ठेवल्याने अनेक अधिकारी-कर्मचारी मतदानापासून वंचित राहीले. त्या स्पेशल कोचमधील कर्मचाऱ्यांना देखील मतदानाचा हक्क बजाविता आला नाही. गुप्ता यांच्या नेहमीच्याच पाहणी दौऱ्याबाबत रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)