नाशिक : मतदार याद्या अद्ययावतीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हा पातळीवर राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्या पुनरीक्षण आणि पडताळणी कार्यक्रमाला पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आलेली आहे. येत्या १५ डिसेंबरपर्यंत नाव नसलेल्या मतदारांना नोंदणी करण्याची संधी मिळणार आहे.
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सप्टेंबर महिन्यात मतदार यादी अद्ययावतीकरण मोहिमेला प्रारंभ केला जाणार हाेता. मात्र याच काळात कोरेानाचे संक्रमण वाढल्यामुळे मतदार नोंदणीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे आता १ जानेवारी २०२१ च्या अर्हता दिनांकावर १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या मतदारांना मतदार यादीत आपले नाव नोंदणी करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी नोंदणीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला असून, येत्या १५ डिसेंबरपर्यत संबंधित मतदारांनी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे.
राज्यात निर्माण झालेल्या कोरेानाच्या संकटामुळे मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात बदल करावा लागला आहे. मे महिन्यात मतदार यादी अंतिम करणे अपेक्षित होते; परंतु कोरोनामुळे ते होऊ शकले नाही, शिवाय पडताळणीचा सप्टेंबरचा कार्यक्रमदेखील रद्द करावा लागला. त्यामुळे आता राज्य निवडणूक विभागाच्या वतीने राज्यात मतदार नोंदणीचा विशेष पुर्नरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
--इन्फो--
इतर माहितीही भरता येणार
येत्या १५ डिसेंबरपर्यंत मतदारांना आपली नावनोंदणी, पत्ता बदल, दुरुस्ती, नावात दुरुस्ती करता येणार आहे. १ जानेवारीच्या अर्हता दिनांकावर ही अंतिम मतदार यादी १५ जानेवारीला प्रसिद्ध केली जाणार आहे. जिल्ह्यात नुकतीच प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे. त्यावर दावे आणि हरकती सुरू आहेत. त्यावरील सुनावणीनंतर अंतिम नावांचा अंतिम मतदार यादीत समावेश केला जाईल.