सिन्नर : क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी मतदारसंघात मतदार जनजागृती केली का नाही याची खातरजमा करण्यासाठी दिल्लीहून आलेले निवडणूक निरीक्षक गया प्रसाद श्रीवास्तव यांनी थेट भ्रमणध्वनीहून मतदार व गावातील संबंधित पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला. मतदारसंघातील अनेकांशी थेट संपर्क साधल्यानंतर गावोगावी मतदार जागृती झाल्याची खातरजमा झाल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले.सिन्नर मतदारसंघातील निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी येथे द्वितीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या सत्रात भगवती लॉन्स येथे झालेल्या प्रशिक्षण वर्गात उपस्थितीत कर्मचाऱ्यांना पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनची माहिती देण्यात आली. सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार मनोजकुमार खैरनार, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी कैलास चावडे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी दिल्ली येथून आलेले निवडणूक निरीक्षक गया प्रसाद श्रीवास्तव यांनी प्रशिक्षण वर्गास भेट घेऊन पाहणी केली. निवडणूक शाखा व महसूल कर्मचाऱ्यांनी मतदान जागृतीसाठी गावोगावी उपक्रम राबविले का? याची माहिती त्यांनी थेट मतदारांसोबत भ्रमणध्वनीहून संपर्क साधून घेतली. त्यानंतर सिन्नर निवडणुकीच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले. पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण वर्गाला १२३६ पैकी ११२६ कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली. ११० गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती तहसीलदार खैरनार यांनी दिली.
मतदारसंघात मतदार जनजागृती
By admin | Published: October 10, 2014 1:30 AM