संदीप भालेराव, नाशिक: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक १ जानेवारी २०१४ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी अनेक शिबिरे घेतली जात आहेत. त्यानुसार येत्या २ व ३ डिसेंबर रोजी तृतीयपंथी, महिला सेक्स वर्कर, भटक्या व विमुक्त जमाती या प्रकारच्या वंचित घटकातील मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रारूप मतदारयादी जाहिर करण्यात आली आहे. जास्तीत जास्त मतदारांची नावे यादीत समाविष्ट करावीत यासाठी विशेष मोहिम जिल्ह्यात सुरू आहे. यापूर्वी महाविद्यालयांमध्ये युवकांच्या विशेष मतदारनोंदणी मोहिम राबविण्यात आली. यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर समिती स्थापन करण्यात येऊन मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच संस्था चालकांना सहभागी करून घेण्यातआले आहे. मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी, महिला, दिव्यांग, बेघर, व भटक्या जमातीतील व्यक्ती, तृतीयपंत्री, देहविक्रय करणाऱ्या महिला यांच्या मतदारनोंदणीकरीता शिबिरे आयोजित करण्याच्या सुचना राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात विशेष शिबिरांची मोहिम सुरू करण्यात आली आहे.
तृतीयपंथीयांच्या मतदानोंदणीसाठी या घटकासाठी कार्यरत असलेल्या अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. तृतीयपंथीयांची अधिक वस्ती असलेली ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.