लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ग्रामपंचायत निवडणूक असल्याने मतदानाच्या दिवशी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना आयोगाने दिलेल्या आहेत. त्यामुळे निवडणूक कर्मचारी, अधिकारी यांची कोरेाना तपासणी करण्याबरोबरच मतदानाला येणाऱ्या मतदारांचीदेखील तपासणी करण्याबाबत सुचविण्यात आलेले आहे. परंतु जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींसाठी होत असलेली निवडणूक तसेच दहा हजारांच्या पुढे असलेली निवडणूक कर्मचाऱ्यांची संख्या पाहता जिल्ह्यात कोरोना तपासणी करण्यात आलेली नाही. केवळ थर्मल स्कॅनिंग यंत्रणा आणि सुरक्षित अंतर या नियमांचे पालन करून कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्न केले जात असल्याचे ग्रामपंचायत निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील जे मतदार कोरोनाच्या कारणामुळे क्वारंटाइन आहेत तसेच ज्यांना खोकला आणि ताप असेल अशा रुग्णांनी मतदानाच्या अखेरच्या अर्ध्या तासात मतदानासाठी येणे अपेक्षित आहे.
--इन्फो--
केवळ थर्मल स्कॅनिंगवरच भर
केवळ थर्मल स्कॅनिंगवरच भर
निवडणूक कर्मचाऱ्यांचे दोनदा प्रशिक्षण झाले आहे. निवडणूक असलेल्या ठिकाणी तालुका पातळीवर तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलेले आहे. मात्र या कर्मचाऱ्यांची कोरोनाच चाचणी करण्यात आलेली नाही. केवळ फिजिकल डिस्टन्स नियमांचे पालन करण्यात आलेले आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान कर्मचाऱ्यांची आणि मतदानाच्या दिवशी मतदारांची थर्मल स्कॅनिंग केली जाणार आहे.
--इन्फो--
पॉझिटिव्ह रुग्णांबाबत गाइडलाइन्सच नाहीत
मतदानासाठी पॉझिटिव्ह रुग्णांबाबत काय करावे याबाबतच्या गाइडलाइन्स नसल्याचे समजते. मतदानाच्या दिवशी लक्षणे असलेल्या तसेच क्वारंटाइन असलेल्या मतदारांनी गर्दीत न येता मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात अर्धातास राहिला असताना मतदानासाठी येणे अपेक्षित आहे. त्यामुळे अशा मतदारांसाठी वाढीव वेळ देण्यात आलेली नाही तर त्यांच्यासाठी अखेरचा अर्धातास राखून ठेवण्यात आलेला आहे.
--इन्फो--
मास्क असताना ओळख पटणार?
सुरक्षितता म्हणून चेहऱ्याला मास्क तसेच हात सॅनिटायझरने स्वच्छ करण्याचा नियम पाळला जाणार आहे. त्यामुळे मतदानकक्षात आलेल्या मतदाराच्या तोंडाला मास्क असला तरी मतदान प्रतिनिधीने ऑब्जेक्शन घेतले तरच मास्क हटविला जाणार आहे.
--इन्फो--
मतदान अधिकारी, कर्मचारी यांची कोरोनाच चाचणी करण्याचे आदेश नाहीत. कर्मचारी संख्या मोठी असल्याने ते शक्यही नाही. त्यामुळे कोरोना सुरक्षितता नियमांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. यासाठी तालुका पातळीवर तालुका वैद्यकीय अधिकारी नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले असून मतदानासाठी येणाऱ्या मतदारांचे थर्मल स्कॅनिंग केले जाणार आहे.