लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव : महानगरपालिका निवडणुकीसाठी बुधवारी मतदानाला उत्साहात प्रारंभ झाला. सकाळीपासूनच भरउन्हात मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. मात्र पूर्व भागात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा प्रकार झाला. याव्यतिरिक्त मतदान प्रक्रिया शांततेत व उत्साहात पार पडली. दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे ४४.८७ टक्के मतदान झाले होते.रिंगणातील ३७३ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून, शुक्रवारी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे. रात्री उशिरा पोलीस बंदोबस्तात मतदान यंत्रे स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येत होती.शहराच्या पूर्व भागात मतदारांनी मतदानासाठी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. दुपारी उन्हाच्या तीव्रतेमुळे मतदारांची संख्या घटली होती. मात्र दुपारनंतर मतदार घराबाहेर पडल्याने पुन्हा मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. यात महिलावर्गाचा उत्साह अधिक दिसून येत होता. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता, तर वृद्ध व दिव्यांगांसाठी महापालिकेने खास वाहनांची व्यवस्था केल्याने त्यांची मोठी सोय झाली.पश्चिम भागातही सकाळच्या सत्रात मतदारांचा उत्साह कमी दिसून आला. दुपारनंतर मतदार मतदानासाठी बाहेर पडले होते. येथील या.ना. जाधव विद्यालय, वर्धमान विद्यालय, आरबीएच कन्या विद्यालयात केंद्रांवर गर्दी केली होती. शिवसेना व भाजपा व इतर पक्षांचे उमेदवार मतदारांची वाहतूक करताना दिसून येत होते. किरकोळ बाचाबाचीचे प्रकार घडता पश्चिम भागातही मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. शहरातील पूर्व भागात मालेगाव हायस्कूल, खातून डी.एड. कॉलेज, पॅराडाईज हायस्कूल, रमजानपुरा भागातील जि.प. उर्दू शाळेत असलेल्या मतदान केंद्रात मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती.
कडक उन्हातही मतदारांत उत्साह
By admin | Published: May 25, 2017 12:51 AM