लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लोकसभा निवडणुकीचे मतदान निर्भयपणे पार पडावे, त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ज्या मतदान केंद्रावर यापूर्वी गडबड झाली असेल त्यांना क्रिटीकल म्हणून संबोधून त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या असून, आता त्यात नव्याने भर घालण्यात आली आहे. राजकीय पक्षाचे उमेदवारांचे ज्या मतदान केंद्रावर मतदान करतील त्या मतदान केंद्राचाही क्रिटीकल म्हणून समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात अशा प्रकारे ६८ केंद्रे तूर्त निश्चित करण्यात आली आहेत.
निवडणूक आयोगाने क्रिटीकल व व्हर्नाबेल अशा दोन गटात मतदान केंद्रांची विभागणी केली आहे. यापूर्वी अशा केंद्रांना संवेदनशील म्हणून गणले जात होते. त्यात बदल करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभा निवडणुकीचे मतदान या काळात मतदान केंद्रावर कोणत्याही कारणास्तव गोंधळ, गडबड, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असेल तर अशी केंद्रे क्रिटीकल म्हणून गणले जाणार आहे. या केंद्रावर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्याबरोबरच, मायक्रो आॅब्झरवर, वेब कॅमेरे लावण्याच्या सूचना आयोगाने केल्या आहेत. आता आयोगाने निकषात पुन्हा बदल केला आहे. ज्या मतदान केंद्रात समाविष्ट असलेल्या मतदारांकडे ८० टक्क्यापेक्षा कमी निवडणूक ओळखपत्र असेल अशा केंद्रांचाही त्यात समावेश करण्यात यावा, अशा सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर निवडणूक रिंगणातील उमेदवारांकडून मतदारांवर प्रभाव टाकला जाण्याची शक्यता असल्यामुळे उमेदवाराचे ज्या मतदान केंद्रात नाव असेल त्या मतदान केंद्रालाही क्रिटीकल म्हणून घोषित करण्यात यावे अशा सूचना आहेत. त्यानुसार समीर भुजबळ, हेमंत गोडसे, माणिकराव कोकाटे व पवन पवार या नाशिक लोकसभा मतदारसंघातील राजकीय पक्षांच्या उमेदवारांची मतदान केंद्रे तसेच दिंडोरी मतदारसंघातील भारती पवार, धनराज महाले, जिवा पांडू गावित यांची केंद्रे क्रिटीकल म्हणून घोषित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील ४७२७ मतदान केंद्रांपैकी ६८ केंद्रे क्रिटीकल आहेत. त्यात दिंडोरी मतदारसंघात १५ तर नाशिक मतदारसंघात ५३ केंद्रे आहेत.