नाशिक- महापालिकेच्या दोन प्रभागांसाठी पोटनिवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहिर केला असून येत्या सोमवारपासून (दि.१६ ) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे तर ९ जानेवारीस मतदान होणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत सिडको विभागातील प्रभाग क्रमांक २६ ब मधील शिवसेना नगरसेवक दिलीप दातीर यांनी राजीनामा देऊन मनसेकडून निवडणूक लढविली होती तर नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक २२ ब मधील भाजप नगरसेवक सरोज आहिरे यांनी राष्टÑवादीकडून निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा दिला. यानंतर सरोज आहिरे या आमदार म्हणून निवडून आल्या असल्या तरी दातीर यांचा मात्र पराभव झाला होता. आता या दोन्ही प्रभागांसाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे.
निवडणूकीची अधिसूचना येत्या १६ डिसेंबर रोजी जाहिर होणार असून त्याच दिवशी पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होईल. १६ ते २३ डिसेंबर पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. मात्र, २२ डिसेंबर रोजी रविवारची सुट्टी असल्याने या दिवशी मात्र अर्ज स्विकारले जाणार नाही. २४ डिसेंबर रोजी छाननी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत २६ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घेता येईल. २७ डिसेंबर रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल तर २७ डिसेंबर रोजी उमेदवारांची अंतिम वैध यादी घोषीत करण्यात येईल. ९ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.