सटाणा : बागलाण तालुक्यातील सटाणा व नामपूर बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सटाणा येथील एकूण १८ जागांपैकी ४ जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित १४ जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात आहेत. तर नामपूरच्या १८ जागांपैकी ५ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित १३ जागांसाठी ३४ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२९) मतदान होत असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. शेतकऱ्यांमधून बाजार समिती पदाधिकायांच्या निवडीचा कायदा झाल्यानंतर राज्यात प्रथमच बागलाण तालुक्यातील सटाणा व नामपूर बाजार समित्यांची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. २८) सकाळी ८ वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मंगळवारी मतदान होत असून, सटाणा बाजार समिती कार्यक्षेत्रात या निवडणुकीसाठी एकूण ५७ मतदान केंदे्र स्थापन करण्यात आली आहेत. तर नामपूर बाजार समिती कार्यक्षेत्रात एकूण ६९ मतदान केंदे्र स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पाच कर्मचारी ठेवण्यात आले असून, त्यामध्ये केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक शिपाई व एक पोलीस शिपाई यांचा समावेश आहे. सटाणा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ५७ मतदान केंद्रांवर एकूण २८५ कर्मचारी व नामपूरच्या ६९ मतदान केंद्रांवर एकूण ३४५ कर्मचारी ठेवण्यात आले असून दोन्ही बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी प्रत्येकी एक भरारी पथक व एक कॅमेरामन ठेवण्यात आला आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून, उमेदवारास मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर ज्यांचे नाव मतदान यादीत आहे असा एक मतदान प्रतिनिधी व एक बदली प्रतिनिधी नेमता येईल.या गणात आहेत चुरस ...दोन्ही बाजार समित्यांचे सभापतिपद खुले असल्यामुळे सटाणा बाजार समितीच्या सभापतिपदासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये चौगाव गणात जिल्हा मजूर संघाचे संचालक शिवाजी रौंदळ, सुनील निकम, केशव मांडवडे, मुंजवाड गणातून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, कंधाणे गणातून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. अनिल पाटील, राकेश मोरे, तळवाडे दिगर गणातून पंकज ठाकरे, अजमिर सौंदाणे गणातील विजय पवार, सटाणा गणातील मंगला सोनवणे, माधवराव सोनवणे, पांडुरंग सोनवणे, डांगसौंदाणे गणातील संजय सोनवणे तर नामपूर मध्ये बिजोरसे गणातील भाऊसाहेब अहिरे, नामपूरमधील अविनाश सावंत, द्याने गणात कारभारी पगार, आसखेडा येथे राजेंद्र सावळा, लक्ष्मण पवार, जायखेडा येथे भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय भामरे, करंजाड गणातील कृष्णा धर्मा भामरे, हे सभापतिपदाचे दावेदार असल्यामुळे या गणात चुरस आहे.
सटाणा, नामपूर बाजार समितीसाठी आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:00 AM