नाशिक- विधानसभा निवडणूक मतदानासाठी अवघे चोवीस तास राहिले आहेत. निवडणूक शाखेने निवडणुकीची व्यापक तयारी केली असून, जिल्ह्यात सर्वत्र यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदा मतदानाचा टक्का वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याने त्यादृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजना आणि मतदानाची सज्जता झाली असून यंदा गत निवडणूकीच्या तुलनेत पाच टक्के तरी मतदान वाढेल असा विश्वास जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी व्यक्त केला आहे. मतदानाची तयारी आणि मतदान वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न याविषयी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सूरज मांढरे यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न- मतदानाला अवघे चोवीस तास राहिले आहेत. त्यादृष्टीने कोणती तयारी करण्यात आली आहे?मांढरे- जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत मतदान होत आहे. मतदानाच्या दिवशी सर्व मतदान केंद्रांवर कायदा सुव्यवस्था आबाधीत राखण्यासाठीची पोलिसांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. व्होटिंग मशीनच्या संचलनावर भर देण्यात आला आहे. यंत्रे बंद पडणार नाहीत याची काळजी घेण्यात आलेली आहे. पावसाची शक्यता असल्याने सर्व मतदारसंघाची पाहणी करण्यात येऊन खबरदारी घेण्यात आलेली आहे. शनिवार, रविवारची रात्र आमच्यासाठी महत्त्वाची असून, सर्व यंत्रणांना सज्जतेच्या सूचना केलेल्या आहेत.
प्रश्न- मतदानचा टक्केवारी वाढविण्यावर आपला भर आहे. नेमकी कशी तयारी केली आहे?मांढरे- लोकसभा निवडणूक संपताच लागलीच विधानसभेची तयारी सुरू करण्यात आलेली होती. त्यामध्ये प्रामुख्याने मतदारयाद्यांचे शुद्धीकरण महत्त्वाची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यामध्ये ५६ हजार ३०३ मयत आणि दुबार नावे वगळण्यात आली. ७५ हजार नवीन नावे नोंदविली गेली. त्यामुळे ५ टक्के तरी जास्त मतदान होण्याचा अंदाज आहे. महाविद्यालये, शाळांमध्ये जनजागृती, गावागावांत, बाजारांमध्ये मतदान जागृतीचे विशेष उपक्रम घेण्यात आले.मुलाखत - संदीप भालेराव