नाशिक : जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली असून, जिल्ह्यात ८०.३६ टक्के इतके मतदान झाले. यंदा मतदान प्रक्रियेत महिला मतदारांचा प्रचंड उत्साह दिसून आला. पुरुषांच्या बरोबरीने महिला मतदानासाठी घराबाहेर पडल्या.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. स्थानिक राजकारण आणि पक्षीय भूमिकेनुसार जिल्ह्यात अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याच्या हालचाली झाल्या. त्यानुसार पंचावन्न ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित ५६५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानासाठी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आल्याने सायंकाळपर्यंत अनेक मतदान केंद्रांवर मतदान सुरू होते. मतदानानंतर तहसील कार्यालयापर्यंत पोहोचणे आणि मतदान यंत्र जमा करण्याची प्रक्रिया यासाठी मतदान कर्मचाऱ्यांना लागणारा वेळ लक्षात घेता मतदानाची टक्केवारी शुक्रवारी उपलब्ध होऊ शकली नव्हती.
ग्रामपंचायत निवडणूक विभागाने शनिवारी मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यात ८०.३६ टक्के इतके मतदान झाले. जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमधील ५६५ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत मतदारांचा प्रचंड उत्साह असल्याने मतदानाची टक्केवारी वाढली असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे पुरुष मतदारांच्या बरोबरीने महिला मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला.
ग्रामपंचायत निवडणूक झालेल्या तालुक्यांमध्ये १०,९५,९७३ इतक्या मतदारांची नोंद झाली होती. त्यापैकी मतदान संपेपर्यंत ८,८०,०६२ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ४,०९,४१२ महिला, तर ४,७०,६४९ पुरुष मतदारांचा समावेश आहे. सकाळी ७.३० वाजता सुरू झालेली मतदान प्रक्रिया सायंकाळी ५.३० वाजता संपुष्टात आली. मतदानादरम्यान जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. तांत्रिक कारणामुळे बिघाड झालेल्या विविध ठिकाणी एकूण ३३ मतदान यंत्रे बदलावी लागली.
५६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सर्व ठिकाणी भरघोस मतदान झाले. सर्वाधिक मतदान त्रंबक तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी झाले. याठिकाणी ८९.५५ टक्के इतके मतदान झाले. त्याखालोखाल दिंडोरी तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींसाठी ८७.३९ टक्के इतके मतदान झाले. आठ तालुक्यांमध्ये ८० टक्क्यांच्या पुढे मतदान झाले.
--इन्फो--
...अशी आहे तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी
तालुकाग्रामपंचायती स्त्री पुरुष एकूण टक्केवारी
नाशिक २२ २३,८३७ २६,९४४ ५०,८४१ ८२.३६
त्र्यंबक ०३ ५५९ ६३२ १,१९१ ८९.५५
दिंडोरी ५३ ३१,२८५ ३५,७५६ ६७,०४१ ८७.२९
इगतपुरी ०७ ३,५१७ ४,०१४ ७,५३१ ८६.४६
निफाड ६० ६२,५५२ ७१,८७० १,३४,४२२ ७५.४२
सिन्नर ९० ६०,४३१ ६९,६८७ १,३०,११८ ८३.९२
येवला ६१ ४३,६३३ ५०,९९२ ९४,६२५ ८४.३४
मालेगाव ९६ ७५,९१८ ८६,५५५ १,६२,४७३ ७७.७३
नांदगाव ५४ ३३,५२२ ३८,२५१ ७१,७७४ ७८.५६
चांदवड ५२ ३०,०२९ ३५,३५९ ६५,३८८ ८४.२४
कळवण २७ १३,०४३ १४,६७२ २७,७१५ ८३.४१
बागलाण ३१ २४,७८७ २८,७८५ ५३,५७२ ७२.२०
देवळा ०९ ६,२३९ ७,१३२ १३,३७१ ८३.१०
एकूण ५६५ ४,०३,४१२ ४,७०,६४९ ८,८०,०६२ ८०.३६