नाशिक : गेल्या चार वर्षांपासून सत्ताधारी वगळता सर्वच विरोधी पक्षांकडून निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम यंत्राला घेतला जाणार आक्षेप व मतपत्रिकांचा वापर करण्याचा धरला जाणारा अट्टाहास पाहता निवडणूक आयोगाने तितक्याच जोरकसपणे आपल्यावरील आरोप धुडकावून लावण्याचा प्रयत्न सुरू केला असून, होऊ घातलेल्या निवडणुकीत ईव्हीएम यंत्रासोबत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार असल्याने ‘आता कोणत्याही शंकेला वाव राहणार नाही, अशा राजकीय पद्धतीने प्रचारालाही सुरुवात केली आहे. भारत निवडणूक आयोगाकडून शनिवारी विधानसभा मतदारसंघनिहाय तयार करण्यात आलेली मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, तेव्हापासूनच देशपातळीवर मतदार पुनरीक्षण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गतच १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर दरम्यान मतदार जनजागृती मोहीम म्हणजेच ‘स्वीप’चा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या जागृती मोहिमेत नव मतदारांना आकर्षित करणे, शाळा, महाविद्यालयांमध्ये लोकशाहीचे महत्त्व पटविणे, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, तर पुनरीक्षण मोहिमेंतर्गत नवीन मतदारांची नोंद, दुबार व मयतांची नावे वगळणे, नाव, पत्त्यात बदल, मतदार यादीत छायाचित्र समाविष्ट करण्यात येणार आहे. या साºयांपेक्षाही आयोगाने सर्वाधिक महत्त्व स्वत:वरील आक्षेप धुवून काढण्यास दिले आहे. २०१४ नंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत एका विशिष्ट पक्षालाच सर्वाधिक मते मिळत असल्याने सर्वच विरोधी पक्षांनी निवडणुकीत वापरल्या जाणाºया ईव्हीएम यंत्रावर आक्षेप घेतला आहे. त्यासाठी काही उदाहरणे देऊन मतदान यंत्रे हॅक करून सत्ताधारी पक्षाला आयोग पूरक भूमिका घेत असल्याचे प्रकरणे न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. मतदान यंत्रावर आक्षेप घेणे एक प्रकारे निवडणूक आयोगावरच अविश्वास दाखविण्यासारखे असल्यामुळे निवडणुकीत ईव्हीएम यंत्राला व्हीव्हीपॅट यंत्र जोडण्यात येणार आहे. जेणे करून प्रत्येक मतदारास त्याचे मत योग्य उमेदवारास पडले याची खात्री करता येणार आहे. शनिवारपासून सुरू होणाºया मतदान पुनरीक्षण मोहिमेंतर्गत प्रत्येक मतदाराला त्याची माहिती व्हावी यासाठी आयोगाने प्रचारपत्रके छापून ते वितरित करण्याचे ठरविले आहे. त्यात ‘ईव्हीएमबरोबर व्हीव्हीपॅट म्हणजे खात्री बरोबर विश्वास’अशी घोषवाक्ये लिहिली असून, आता कोणत्याही शंकेला वाव राहणार नाही, असा छातीठोक दावाही आयोगाने या पत्रकात केला आहे. प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत प्रचारपत्रके पोहोचविण्याची जबाबदारी बीएलओंवर तसेच राजकीय पक्षांवर सोपविण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाकडून ‘व्हीव्हीपॅट’ यंत्राचा प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 11:46 PM