नाशिक : पारंपरिक अभ्यासक्रमापेक्षा कृतीवर भर, दप्तर शाळेतच आणि काचेच्या वर्गातील पारदर्शक शिक्षण... वाबळेवाडीतील आदर्श शाळेचा कित्ता गिरवण्याचे महापालिकेने ठरविले असून, त्यासाठी ४५ शिक्षकांनी या शाळेस भेट दिली. येथील शिक्षणाची एकूणच पद्धत बघितल्यानंतर सर्र्वच शिक्षक थक्क झाले. आता प्रायोगिक तत्त्वावर किमान एक ते दोन शाळांमध्ये वाबळेवाडी पॅटर्न राबविण्याची तयारी करण्यात आली आहे.बावळेवाडी येथील शाळा ही आदर्श मानली जाते. याठिकाणी पारंपरिक शिक्षणाऐवजी मुलांना हसत-खेळत ज्ञान दिले जाते आणि मुलेही अत्यंत हुशार आहेत. त्यामुळे या शाळेत प्रवेशासाठी रांगा लागतात. त्यामुळे एका सरकारी शाळेतील हा बदल अत्यंत चर्चेचा विषय ठरला आहे.विशेषत: ३२ इतकी कमी पटसंख्या असताना आता मात्र शाळेतील अंतर्बाह्य बदलानंतर सध्या सहाशेहून अधिक मुले आहेत. राज्य शासनाच्या महाराष्टÑ आंतरराष्टÑीय शिक्षण मंडळाच्या शिक्षणक्रमाचे औचित्य साधून हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिक मनपात अशाप्रकारचे प्रयोग राबविण्यासाठी शिक्षणाधिकारी देवीदास महाजन आणि ४५ शिक्षकांनी शनिवारी (दि.१४) वाबळेवाडीस भेट दिली.शाळेचा आकर्षक आवार, काचेच्या वर्गात मुलांना बसण्यासाठी ओटे अशा अनेक भौतिक सुविधा तर आहेत शिवाय प्रत्यक्ष खेळातून मुलांना शिक्षण मिळावे यासाठी शैक्षणिक खेळ आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांचे शिक्षण अत्यंत प्रगत असून सकाळी ९ ते १ या वेळात वर्गात मुलांना सक्तीने शिक्षण घ्यावे लागते. त्यानंतर ही मुले कोणत्याही वर्गात जाऊन ज्ञान घेऊ शकतात. सहावी, सातवीची मुले स्काईपवर विदेशातील शाळांमधील मुलांशी इंग्रजीत संवाद साधत असल्याचे महाजन यांनी सांगितले.अशाप्रकारची शाळा महापालिकेच्या वतीने सुरू होईल तेव्हा होईल, परंतु अनेक शिक्षकांनी सध्याच्या शाळांमध्येदेखील शिक्षणाचे अनोखे प्रयोग करण्याची तयारी दर्शविली आहे.महाराष्टÑ शासनाच्या महाराष्टÑ आंतरराष्टÑीय शिक्षण मंडळाकडे येत्या महिनाभरात अर्ज करण्यात येईल आणि किमान दोन शाळा या पद्धतीने विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अशाप्रकारच्या शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षक शासनाकडूनच पाठविले जातात.- देवीदास महाजन, शिक्षणाधिकारी, महापालिका
मनपाच्या शाळांमध्येही वाबळेवाडी पॅटर्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 1:26 AM