सिन्नर : गेल्या चोवीस वर्षांपासून सुरू असलेली वाडा-शिर्डी बससेवा अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. बसचे उत्पन्न घटल्याने सदर बस बंद करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी, या बसने दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी खासगी वाहतुकीचा आधार घेण्याची वेळ आली आहे.ठाणे जिल्ह्णातील वाडा आगाराने २४ वर्षांपूर्वी वाडा-शिर्डी बस सुरू केली होती. नाशिक-शिर्डी मार्गावर धावणारी सदर बससेवा अतिशय जुनी मानली जाते. जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, नाशिक, सिन्नर, पांगरी, वावी, पाथरे व शिर्डी या मार्गाने धावणारी सदर बस या मार्गावर कामगार, वारकरी, प्रवासी व विद्यार्थ्यांसाठी सोयीची मानली जात होती. गेल्या वर्षी उत्पन्न कमी मिळते असे कारण दाखवून सदर बससेवा बंद करण्यात आली. प्रवाशांच्या मागणीवरून पुन्हा चार दिवसात सुरू करण्यात आली होती. वर्षभरानंतर पुन्हा गेल्या आठवड्यापासून सदर बस बंद केल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या बसने अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांना बस बंद झाल्याची बातमी अस्वस्थ करून गेली. शिर्डी येथून सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास वाडाकडे निघणाऱ्या या बसमध्ये मुसळगाव व माळेगाव औद्योगिक वसाहतीतील कामगार व सकाळी सिन्नर महाविद्यालयात जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचा भरणा मोठ्या प्रमाणात होता. कामगार व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सदर बस अतिशय सोयीची होती. गेल्या अनेक वर्षापासून ये-जा करणाऱ्या या बसच्या चालक व वाहक यांचे दररोज अपआऊन करणारे चाकरमाने व विद्यार्थ्यांसोबत मैत्रीचे संबंध निर्माण झाले होते. वाडा-शिर्डी बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी राहुल डुबे, संजय थोरात, सदाशिव पठाडे, दीपक शिंदे, गणेश पगार, दत्तात्रय दवंगे यांच्यासह प्रवासी, विद्यार्थी व कामगारांनी केली आहे. (वार्ताहर)
वाडा-शिर्डी बससेवेला ‘ब्रेक’
By admin | Published: February 22, 2016 11:23 PM