-----
बिर्दी सायकल ट्रॅकवर हवे पथदीप
नाशिक : वडाळा चौफुलीपासून तर थेट साईनाथनगर सिग्नलपर्यंत आमदारनिधीतून साकारण्यात आलेल्या जसपालसिंग बिर्दी सायकल ट्रॅकवर रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. यामुळे संध्याकाळी येथे सायकलपटूंना फेरफटका मारता येत नाही. या सायकल ट्रॅकवर पथदीप बसविण्याची मागणी सायकलप्रेमींकडून केली जात आहे. तसेच ट्रॅकच्या दुतर्फा गाजरगवताचे साम्राज्य पसरले असून ट्रॅकची नियमित स्वच्छता करण्यावरही भर देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
---
मांगीरबाबा चाैकात हवे चार दिवे
नाशिक : वडाळा गावातून जाणाऱ्या श्री.श्री.रविशंकर दिव्य मार्गावरील मांगीरबाबा चौकामध्ये तसेच संत सावतामाळी रस्त्याला छेदणाऱ्या त्रिफुलीवरील वाहतूक बेटाजवळ जास्त प्रकाश देणारे चार दिव्यांचे पथदीप बसविण्याची मागणी होत आहे. रात्रीच्या वेळी या दोन्ही चौकांमध्ये सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. यामुळे वाहनचालकांना वाहने नजरेस पडत नाहीत व अपघातांना निमंत्रण मिळते. महापालिका विद्युत विभागाने या रस्त्यावर चार दिवे असलेले पथदीप बसविण्याची गरज आहे.
-----
रविशंकर मार्गावर भाजीबाजाराचा अडथळा
नाशिक : श्री.श्री रविशंकर दिव्य मार्गावर विजय-ममता सिग्नलपासून तर थेट वडाळा-डीजीपीनगर जॉगिंग ट्रॅकपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा सतत अवजड वाहनांसह हलक्या वाहनांची वर्दळ सुरू असते. या रस्त्यावर कुर्डुकरनगरपासून नारळाच्या वाडीपर्यंत रस्त्यालगत भाजीविक्रेत्यांपासून तर विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे वाहनांमधील स्टॉल, फळविक्रेते तसेच अन्य घरगुती साहित्य विक्री करणाऱ्यांची संख्या संध्याकाळी दिवसेंदिवस वाढू लागल्याने या बाजाराचा वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ लागला आहे. ग्राहकांकडून रस्त्यावरच वाहने उभी करून खरेदी केली जात असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
-----