नाशिक : वडाळागाव परिसरासह विनयनगर, इंदिरानगर, रविशंकर मार्ग, अशोकामार्ग, पखालरोड, हॅप्पीहोम कॉलनी या भागाचा शहराशी संपर्क तुटला आहे. नासर्डी नदीवरील वडाळारोड, पखालरोड, इस्कॉन मंदिराजवळील पुलांवरून नदीचे पाणी वाहू लागल्याने इंदिरानगर, मुंबईनाका, उपनगर पोलिसांनी वाहतूक बंद केली आहे.रविशंकर मार्गावरून वाहणारा नाला क्षत्रिय समाज मंगल कार्यालयाच्या पाठीमागे ओव्हरफ्लो झाल्याने पाण्याचे लोंढा रस्त्यावर वाहू लागला आहे. यामुळे थेट विजय-ममता सिग्नलपर्यंत गुडघ्याएवढे पाणी साचले आहे. तसेच पखालरोडवरील समतानगरमधून नाला रस्त्यावर आल्यामुळे अशोका शाळेजवळ दुभाजकापर्यंत तलाव साचला आहे. तसेच अशोका मार्गावरील नाशिक मर्चंट बॅँके शेजारून वाहणारा नालादेखील रस्त्यावर वाहू लागल्याने तेथून संपुर्ण अशोका मार्ग जलमय झाला आहे. अशोका मार्गावर दुतर्फा दुभाजकाच्या उंचीपर्यंत पाण्याचे पाट वाहू लागले आहे. कल्पतरूनगर, सिध्दीविनायक पार्क, नारायणबापूनगर, आदित्यनगर, गणेशबाबानगर या भागात पाण्याचे तळे साचले आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. रविशंकर मार्गावर जाणारी पुणे महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच अशोका शाळेपासून पुढे विजय-ममता सिग्नलपर्यंत वाहतूक रोखली गेली आहे. रविवारची सुटी असल्यामुळे या भागातील अबालवृध्द रस्त्यावर उतरले आहे. मुख्य रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागल्याने त्यामध्ये नागरिक आनंद लुटताना दिसून आले. अशोका मार्गावरून दुतर्फा पाण्याचे पाट वाहू लागल्याने ‘जलमार्ग’ तयार झाला आहे. कुर्डूकरनगरपासून विजय-ममता चिंचेच्या वृक्षाजवळील चौफुलीपर्यंत रविशंकर मार्गावर पाण्याचे पाट मोठ्या प्रमाणात वाहत होते. यामुळे येथून मार्गक्रमण करणे धोक्याचे झाले आहे. अग्निशामक दलाला या ठिकाणी पाचारण करण्यात आले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जेसीबीला बोलावून नाल्यासमोरील दुभाजक तोडण्यात आले. त्यामुळे दुपारी दीड वाजेपासून पाण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले होते. फायरमन प्रमोद लहामगे, जगदीश देशमुख, बंबचालक संजय घुगे यांनी ध्वनिक्षेपकावर उद्घोषणा करत रस्त्यावर वाहणाऱ्या नाल्यांच्या पूरातून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आपआपल्या घरी जाण्यास सांगितले. तसेच शहर व परिसरात कलम १४४ अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
वडाळा चौफूलीपासून पुढे म्हसोबा महाराज मंदीराजवळील नालादेखील ओव्हरफ्लो झाल्यामुळे खोडेनगर, अक्सा कॉलनी, जयदीपनगर, मिल्लतनगर या भागात पाणी शिरले. येथील मोकळ्या भुंखंडांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. तसेच वडाळा-नाशिक या मुख्य रस्त्यावरून नाल्याचे पाणी वाहू लागल्याने वडाळावासीयांना चौफूलीवरून साईनाथनगरमार्गे जावे लागले. चिश्तिया कॉलनी, मिल्लतनगर परिसरात संपुर्ण वडाळा रोड पाण्याखाली गेला. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली.