वडाळागावात हातावर काम करणाऱ्या लोकांची वस्ती म्हणून ओळखली जाते. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार वडाळागावात महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून सुमारे वीस खाटांचे रुग्णालय बांधण्यात आले. परंतु अद्यापपर्यंत पूर्णवेळ डॉक्टर नसल्याने आणि रुग्णाला औषधोपचारासाठी दाखल करण्याची व्यवस्था नसल्यामुळे हे रुग्णालय असून नसल्यासारखे आहे. या रुग्णालयात फक्त प्राथमिक उपचार करण्यात येतात. सुमारे एक वर्षापासून एक वैद्यकीय अधिकारी सकाळी १० ते दुपारी १ ते वाजेपर्यंत बाह्यरुग्ण तपासणी करून निघून जातात. या ठिकाणी सर्दी, खोकला अशा जुजबी आजारावरच उपचार करून औषधे दिली जातात तसेच लसीकरण करण्यात येते. या पलीकडे दुसऱ्या आजारावर या रुग्णालयात उपचार होत नाही. एक वैद्यकीय अधिकारी, एक फार्मासिस्ट, परिचारिका, वाॅर्डबॉय, सुरक्षा रक्षक असा अपूर्ण कर्मचारीवर्ग कार्यरत आहे. तसेच सायंकाळी सहा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत हे रुग्णालय बंद असते. त्यामुळे गंभीर रुग्णांना उपचारासाठी डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात किंवा जिल्हा रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची ीरुग्णालयात नियुक्ती करावी अशी मागणी केली जात आहे.
वडाळागावातील रुग्णालय ‘असून अडचण नसून खोळंबा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:17 AM