हेमंत कुलकर्णी ल्ल नाशिकनुसतं बोधचिन्हं घेऊन काय उपयोग? मागचा, पुढचा, डावीकडचा, उजवीकडचा असा कोणताही विचार न करता, वाघ कधीही झडप मारीत नसतो. सावज आपल्या पट्ट्यात आलं आहे ना, याची खात्री करुन घेऊन मगच तो झेप घेतो. पण ती घेतानाही चुकून काही गडबड होण्याच्या धोका जाणवला तर सुरक्षित मागे फिरायचा मार्गदेखील आधीच हेरुन ठेवतो. वाघाची झेप आणि डुक्कर मुसंडी यात हाच तर फरक असतो! निवडणुकीचं राहू द्या. तिच्यासाठी हाती धनुष्यबाण धरावं लागलं. कारण मेनका गांधी आडव्या येत असल्यानं वाघाला निवडणुकीपुरतं बाजूला सारावं लागलं. पण सेनाप्रमुखांच्या मते शिवसेना म्हणजे ढाण्या वाघांची फौज! पण आज याच फौजेकडे बधून, वाघोबा; वाघोबा, भागलास का, ‘कमळाबाई’च्या पदराखाली लपायला बघतोस का? असा प्रश्न खुद्द या ढाण्या वाघाच्या फौजेतील ढाण्यांना आणि पट्टेरींनाही बहुधा पडू लागला असेल. नव्हे, तो पडलाच आहे. युद्धाला तोंड फुटण्यापूर्वी आणि प्रत्यक्षात युद्ध सुरू असताना आपल्या सैन्याच्या मनोबलाचे कुठेही खच्चीकरण होणार नाही, याची दक्षता घेणे, सेनापतीचे कर्तव्यच असते. पण सैन्याचे मनोबल आणि त्याचे नीतीधैर्य उंचावत नेणे व स्वत:च्या ताकदीचा नेमका अदमासच न येणे, यात खूप अंतर असते. पण प्रश्न केवळ आत्मबलाचा अंदाज येणे वा न येणे इतक्यापुरताच मर्यादित नसतो, तर प्रतिस्पर्ध्याच्या ताकदीचा वास्तव अंदाज येणे अथवा न येणे, हेदेखील या संदर्भात तितकेच महत्वाचे आणि निर्णायक असते. यातील प्रत्येक बाबतीत शिवसेनेचा घोळच झालेला दिसतो आणि त्याचीच परिणती आज दिसून येते आहे. शिकारीचे सोडा, राजकारणातदेखील कोणीही तरबेज माणूस कधीही कड्याच्या टोकावर जाऊन उभा राहत नसतो. इंग्रजीत ज्याला ‘नो रिटर्न पॉईन्ट’ म्हणतात म्हणजे जेथून माघारी परतण्याचे सारे दोर कापलेले असतात, तिथपर्यंत कोणीही जात नसतो. जवळचे उदाहरण अण्णा हजारे यांचे. त्यांनी शेकड्यांनी ‘प्राणांतिक’ उपोषणे केली. पण प्रत्येक उपोषण सुरु करण्यापूर्वी, त्यातून ‘यशस्वीरीत्या’ बाहेर पडण्याचा मार्ग त्यांनी अगोरदच प्रशस्त करुन ठेवलेला असतो. शिवसेनेने मात्र सारे काही नेमके उलटेच करुन ठेवले. तब्बल पंधरा वर्षांच्या कुपोषण वा उपोषणानंतर आपण सत्तासोपानाच्या समीप जाऊ शकतो, असे चित्र दिसू लागल्यानंतर कधी एकदा तो सोपान गाठतो आणि सरसर चढून शिखरावर जातो, याची आस आणि ओढ लागणे, हा तर मनुष्यस्वभावच झाला. पण याचा अर्थ असा नव्हे की, तो सोपान गाठण्याची ईर्ष्या मनी बाळगणारे आपण एकटेच आहोत. लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला जे यश मिळाले, ते प्राय: नरेन्द्र मोदी यांच्या झंझावातामुळे. पक्षभेद लक्षात घेता, त्याची जाहीर कबुली न देणे समजण्यासारखे असले तरी, मनात ते पक्के बांधून ठेवणे, यालाच तर बिलंदर राजकारण म्हणतात. सेनेने तसे करणेही मनोमन नाकारले. त्याचबरोबर कृतीपेक्षा लोकशाहीत उक्ती अनेकदा घातक ठरत असते, याचेही भान सेनेने ठेवले नाही. संधी मिळेल तेव्हां आणि न मिळेल तेव्हांही आपल्या घटस्फोटित जोडीदाराला हिणवत आणि डिवचत राहण्याचा कार्यक्रम सेनेने अव्याहत सुरु ठेवला. अखेर राजकारण आणि त्यातही पुन्हा सत्तेसाठी केल्या जाणाऱ्या सत्ताकारणाचा फड म्हणजे साधू-संतांचा मठ वा आश्रम नव्हे. परिणामी विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपाने सेनेच्या तोवरच्या प्रत्येक उक्तीला कृतीने उत्तर देण्यास प्रारंभ केला. त्यांच्या या कृतीला एक दुसरी कृतीशील जोड मिळाली ती शरद पवारांच्या राजकारणाची. या राजकारणाला कुणी चलाख म्हणतं, कुणी बेरकी, कुणी लोभी, कुणी स्वार्थी, कुणी लबाड, कुणी आत्मघातकी तर कुणी तत्त्वशून्यदेखील म्हणतं. त्याला नाव कोणतंही द्या, वा नावं कितीही ठेवा, त्याचा दृष्य परिणाम एकच. बुद्धिबळाच्या पटावरील राजा कोपऱ्यात ढकलला गेला! बुद्धिबळात पारंगत नसलेला एखादा गडी आपणहूनच आपल्या राजाला कोपऱ्यात घेऊन जातो, हेही इथं लक्षात घ्यायचं. आपल्याच कल्पनेतील आपल्या मर्दानी पण वास्तवातील आत्मघातकी खेळीपायी आज शिवसेना अक्षरश: दुभंगाच्या वाटेवर चालू लागली आहे. कालपर्यंत ज्यांची सेनेच्या पक्षप्रमुखांसमोर ब्र काढण्याची हिंमत होत नव्हती, तेही प्रमुखांना सल्ले देऊ लागले आहेत. यातील एक सल्ला, मान ताठ ठेऊन भाजपाशी दोन हात करीत राहण्याचा तर दुसरा भाजपा दयार्द्र भावनेने जी काही माधुकरी देईल त्यावर समाधान मानण्याचा. पण प्रत्यक्षात हे दोन्ही सल्ले अंतिमत: सेनेला विलयाकडे घेऊन जाणारे आहेत व पक्षप्रमुखांना घोर लागला(च) असेल तर तो याचाच आहे. प्रश्न केवळ भाजपाच्या येत्या शुक्रवारी अस्तित्वात येणाऱ्या सरकारमध्ये सामील व्हायचे वा नाही, स्वाभिमान जपायचा की त्याला तिलांजली द्यायची, आजवर भाजपावर जे शाब्दिक आघात केले, त्यातील वैयर्थ्य कबूल करायचे की यापुढेही आघात करीतच रहायचे, इतक्यापुरता मर्यादित नाही. कारण निसर्गात वाघाला डिवचले तर तो चवताळतो हे साऱ्यांना ठाऊक आहे पण कमळाला डिवचले तर ते काय करते वा काय करु शकते, याचा कोणालाच अंदाज नाही. शिवसेनेचा जन्म मुळात मुंबईतला. ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यातील टक्क््यांची अदलाबदल झाली ती या मुंबई शहरातच. आणि सत्तेचा स्पर्श आणि तिची शीतलता सर्वप्रथम अनुभवाला आली ती याच मुंबईत. पण मंत्रालयाच्या रुपाने नव्हे तर मुंबई महापालिकेच्या रुपाने. गोवा, मेघालय, आसाम आणि हिमाचल प्रदेश या चार राज्यांचा मिळून अर्थसंकल्पाचा जो आकडा तयार होतोे, त्यापेक्षा मोठा आकडा एकट्या मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा आहे. याचा अर्थ ही महापालिका ताब्यात असणे आणि वरील चार राज्ये कब्जात असणे, एका अर्थी आणि अर्थाअर्थी एकच. भाजपाशी असलेले वैर, द्रोह वा स्पर्धा तशीच टिकवून ठेवायची झाली तर भविष्यात काय वाढून ठेवलेले असेल याचा काही अंदाजच लागू शकत नाही. देश भाजपाच्या ताब्यात, राज्य भाजपाच्या ताब्यात आणि राज्यपालदेखील भाजपाच्याच मुशीतला. काहीही होऊ शकेल. होईलच असे नाही. पण होणारच नाही, असेही नाही. सेना जशी छत्रपतींना आराध्य देव मानते तशीच ती सावरकरांना पूजनीय मानते. सावरकरांच्याच एका तत्त्वाचा विचार करता, प्रतिकूल घडेल तेच गृहीत धरायचे असते. परिणामी क्षात्रतेज धारण करायचे झाल्यास, मिळणारे तर मिळणारच नाही पण जे मिळाले आहे, तेही टिकणार नाही. म्हणजे आज शिवसेनेची भाजपाच्या संदर्भातली जी अवस्था झाली आहे, ती ‘धरलं तर चावतं, आणि सोडलं तर पळतं’ यापेक्षा वेगळी नाही. इथे फार फार तर सेनेच्या बाजूने एक युक्तिवाद करता येऊ शकतो की, भाजपा अखेर सुसंस्कृत, सदाचारी आणि हिन्दुत्वाच्या दयाशील व क्षमाशील विचारसरणीला मानणारा पक्ष आहे, शरण आलेल्याला मरण न देण्याचा धर्म पाळणारा आहे. त्यामुळे या पक्षाने झाले गेले गंगेला मिळाले असे समजून नव्याने संसाराला लागायला काय हरकत आहे? युक्तिवाद तर तसा खरोखरीच तार्किक. पण खुद्द सेनेच्या नजरेतील अफझलखान, शास्ताखान, अहमदशाह, कुतुबशाह आणि त्यांच्या शाही फौजा यांचा कुठला आला आहे या साऱ्यांशी संबंध? ‘काफिर है, कुचल डालो’!
वाघोबा; वाघोबा, भागलास का रे?
By admin | Published: October 28, 2014 11:55 PM