अझहर शेख, नाशिक: मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढे त्याची वाटचाल सुरू झालेली असताना अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची स्थिती निर्माण होऊन तीव्र झाली. यामुळे नैर्ऋत्य मोसमी वारे प्रभावित झाले. जूनच्या अखेरच्या आठवड्यात मध्य भारतात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. हंगामी पावसाच्या जोरदार वर्षावासाठी अजून काही दिवस ‘वेट ॲन्ड वॉच’ करावे लागणार आहे.
मार्च, एप्रिलमध्ये अवकाळी वादळी पावसाने नाशिक शहरासह जिल्ह्याला दणका दिला. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते. शेतकरी या हल्ल्यातून सावरत असताना पुन्हा जूनचे वीस दिवस संपूनही हंगामी पावसाचे आगमन अद्याप झालेले नाही. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. पावसाचे आगमन लांबणीवर गेल्याने खरिपाच्या पेरण्याही खोळंबल्याचे चित्र दिसत आहे.
नैर्ऋत्य मोसमी वारे अद्यापही फारसे सक्षम झालेले दिसत नाही. दिसत नाही. दक्षिण व ईशान्य भारतात २१ जूनपर्यंत पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. २३ जूनपासून मध्य भारतात पावसाला सुरुवात होणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. जुलैच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यांत पाऊस चांगला होऊ शकतो; मात्र चौथ्या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी होईल, अशी हवामानाची स्थिती दर्शवीत असल्याचा अंदाज राज्याचे हवामान विभागाने वर्तविला आहे.
शेतीच्या कामांचे नियोजन मोघम नको
शेतीच्या कामांचे नियोजन हे कृषी विभागाकडून माहिती घेऊनच करायला हवे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन मोघम करायला नको, कारण पावसाचा लहरीपणादेखील लक्षात घ्यायला हवा, असे तज्ज्ञांचे मत आहे.